बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणी मोठी अपडेट! हत्येमागे बिश्नोई गँगचा हात, हल्लेखोरांचं छायाचित्र समोर, दोघे ताब्यात
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणी मोठी अपडेट! हत्येमागे बिश्नोई गँगचा हात, हल्लेखोरांचं छायाचित्र समोर, दोघे ताब्यात

बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणी मोठी अपडेट! हत्येमागे बिश्नोई गँगचा हात, हल्लेखोरांचं छायाचित्र समोर, दोघे ताब्यात

Oct 13, 2024 11:12 AM IST

Baba Siddique Murder : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दोन हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एक उत्तर प्रदेशचा आणि दुसरा हरयाणाचा आहे, तर तिसरा आरोपी घटनास्थळावरून पळून गेला आहे.

बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणी मोठी अपडेट! हत्येमागे बिश्नोई गँगचा हात, हल्लेखोरांचे छायाचित्र आले पुढे; दोघे ताब्यात
बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणी मोठी अपडेट! हत्येमागे बिश्नोई गँगचा हात, हल्लेखोरांचे छायाचित्र आले पुढे; दोघे ताब्यात (HT_PRINT)

Baba Siddique Murder : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची वांद्रे पूर्व भागात शनिवारी रात्री तिघांनी गोळ्या झाडून हत्या केली. निर्मल नगरयेथील कोलगेट मैदानाजवळ बाबा सिद्दीकी यांचा मुलगा व आमदार जीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर घडलेल्या या घटनेनंतर दोघांना अटक करण्यात आली. तिसऱ्या आरोपीची ओळख पटल्याची देखील माहिती आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाचे नाव करनैल सिंह असून तो मूळचा हरियाणाचा आहे. तर दुसऱ्या आरोपीचे नाव धर्मराज कश्यप असून तो उत्तर प्रदेशचा आहे. हल्लेखोर हे रिक्षानं घटनास्थळी आले. तर या हल्ल्यात चौथा व्यक्ति देखील होता. तो या तिघांना गाईड करत असल्याची माहिती आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे बिश्नोई गँगचा हात असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच एसआरए वादाच्या दृष्टीने देखील पोलिस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हरियाणा आणि उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत. मुंबई क्राइम ब्रँच या प्रकरणाचा तपास करत आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी काही व्यावसायिक वैमनस्यातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, सिद्धीकी यांच्यावर दोन ते तीन राऊंड गोळ्या झाडण्यात आल्या. सिद्दीकी यांना १५ दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि त्यांना 'वाय' श्रेणीची सुरक्षा देण्यात आली होती.

हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात ?

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात साबरमती कारागृहात बंदिस्त असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या दृष्टीने मुंबई पोलिस तपास करत आहेत. पोलीस वेगवेगळ्या अँगलने या घटनेचा तपास करत आहेत. सलमान खान व बाबा सिद्दीकी यांच्यात चांगली मैत्री होती. लॉरेन्स बिष्णोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तर, एप्रिल महिन्यात सलमान खानच्या घरावर बिष्णोई गँगने गोळीबार करण्यात आला होता.

आरोपी हे रिक्षाने घटनास्थळी आले होते. हल्लेखोर हे बाबा सिद्धिकी याची वाट पाहत होते. यानंतर घटनास्थळी फटाके फोडण्यात आले. या आवाजाच्या आडून त्यांनी सिद्धीकी यांच्यावर गोळीबार केला.

सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर टीका करत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बाबा सिद्दीकी यांनी तीन वेळा विधानसभेत वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. मुंबईतील प्रमुख मुस्लीम नेते सिद्दीकी हे बॉलिवूडमधील अनेक स्टार्सचे निकटवर्तीय म्हणूनही ओळखले जात होते.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, 'या दु:खाच्या क्षणी मी बाबा सिद्दीकी यांचे कुटुंबीय, मित्र आणि समर्थकांप्रती संवेदना व्यक्त करतो. न्याय मिळाला पाहिजे आणि विद्यमान महाराष्ट्र सरकारने सखोल आणि पारदर्शक चौकशीचे आदेश द्यावेत. दोषींना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. उत्तरदायित्व सर्वोपरि आहे.

शरद पवार म्हणाले की, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था चिंताजनक आहे. गृहमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करताना पवार म्हणाले की, परिस्थितीला इतक्या हलक्या तऱ्हेने घेतले जात आहे, ही चिंताजनक बाब आहे. सत्ताधारी पक्षाने या घटनेची जबाबदारी घेऊन सत्ता सोडावी, असे शरद पवार यांनी 'एक्स'वर लिहिले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर