Baba Siddique Quits Congress : काँग्रेसचा मुंबईतील एक प्रमुख मुस्लिम चेहरा असलेले माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांनी अखेर पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी ही माहिती दिली आहे. सिद्दिकी हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
'किशोरवयात मी काँग्रेस पक्षात काम करण्यास सुरुवात केली. गेली ४८ वर्षे हा प्रवास सुरू होता. आज हा प्रवास थांबवतो आहे. मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बोलण्यासारखं बरंच काही आहे. त्यावर बोलायला मला आवडलंही असतं, पण काही गोष्टी न बोलणं चांगलं असतं. आतापर्यंतच्या प्रवासात मला साथ देणाऱ्यांचे आभार, असं ट्वीट बाबा सिद्दिकी यांनी केलं आहे.
देशात मोदीपर्व सुरू झाल्यापासून व चौकशी यंत्रणांचा ससेमिरा मागे लागल्यापासून विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी भाजप किंवा त्यांच्या सोबतच्या मित्र पक्षांमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग पत्करला आहे. लोकसभा निवडणूक जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर या पक्षांतराला अधिक वेग येण्याची शक्यता आहे. बाबा सिद्दिकी यांच्यापासून ही सुरुवात झाली आहे.
मुंबईतील वांद्रे येथील एसआरए घोटाळ्यात बाबा सिद्दिकी यांचं नाव आलं होतं. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं (ED) त्यांच्यावर पीएमएलए अंतर्गत कारवाई करून त्यांची संपत्तीही जप्त केली होती. त्याच्यावर अनेक आरोप होते.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक गट भाजपसोबत गेल्यानंतर बाबा सिद्दिकी हे काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. ‘आज तरी मी काँग्रेसमध्ये आहे. उद्याचं सांगू शकत नाही,’ असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्याचवेळी ते काँग्रेस सोडतील हे निश्चित मानलं जात होतं. ते खरं ठरलं आहे.
बाबा सिद्दिकी यांचे चिरंजीव झिशान सिद्दीक हे वांद्रे पूर्व मतदारसंघाचे आमदार आहेत. याच मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचा 'मातोश्री' हे निवासस्थान आहे. झिशान सिद्दिकी हे देखील त्यांच्या वडिलांपाठोपाठ पक्षाला रामराम ठोकण्याची शक्यता आहे. सिद्दिकी यांच्या पक्षांतरामुळं मुंबईतील वांद्रे भागातील राजकीय समीकरणं काही प्रमाणात बदलणार आहेत.