माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणाचा मुंबई पोलीस तपास करत आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. मात्र, गुजरातच्या साबरमती तुरुंगात बंद असलेल्या लॉरेन्स बिश्नोईची कोठडी मिळवणे मुंबई पोलिसांसाठी आव्हान बनले आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारात लॉरेन्स बिश्नोईचे नाव आले होते. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने अनेकवेळा अर्ज दाखल करूनही कुख्यात गुंड बिश्नोईचा ताबा मिळवण्यात त्यांना यश आले नव्हते.
निर्मलनगर येथील कोलगड मैदानाजवळ आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर शनिवारी रात्री तीन हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा दावा केला आहे.
लॉरेन्स बिश्नोईचा ताबा मुंबई गुन्हे शाखेकडे मिळण्यात सर्वात मोठा अडथळा केंद्रीय गृहमंत्रालयाचा आदेश आहे. या आदेशामुळे लॉरेन्स बिश्नोई यांची अहमदाबादच्या साबरमती तुरुंगातून हस्तांतरण केले जाऊ शकत नाही. सीआरपीसीच्या कलम २६८ (१) अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार एखाद्या हायप्रोफाईल कैद्याच्या हालचालींमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची भीती वाटत असेल तर सरकार त्याला आळा घालू शकते. यापूर्वी हा आदेश ऑगस्ट २०२४ पर्यंत होता. पण मिळालेल्या माहितीनुसार आता त्यात वाढ करण्यात आली आहे.
लॉरेन्स बिश्नोई ला ऑगस्ट २०२३ मध्ये तिहार तुरुंगातून साबरमती मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले होते. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात हा निर्णय घेण्यात आला. बिश्नोई याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. याशिवाय पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली होती. बिश्नोई तुरुंगात असताना त्याचे काम परदेशात स्थायिक झालेले अनमोल बिश्नोई, गोल्डी बरार आणि गोदार हे तीन वाँटेड गुंड चालवत आहेत. एनआयएच्या अहवालानुसार बिश्नोई टोळीचे जाळे दाऊद इब्राहिमच्या नेटवर्कप्रमाणे फोफावत आहे.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आपण बिश्नोई टोळीतील असल्याचे मुंबई पोलिसांना सांगितले आहे. त्यानंतर या टोळीचा सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या अकाऊंटवरून या खुनाची जबाबदारीही घेण्यात आली आहे. या पोस्टचा बिश्नोई टोळीशी खरंच संबंध आहे का, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सलमान खानसोबत ज्याचे जवळचे संबंध असतील त्याला टार्गेट केले जाईल. काळ्या हरणाची शिकार केल्यापासून बिश्नोई टोळी सलमान खानला लक्ष्य करत आहे. बिष्णोई समाज काळ्या हरणाची पूजा करतो.
संबंधित बातम्या