राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमाराला मुंबईतील वांद्रे भागात ही घटना घडली. बाबा सिद्दीकी त्यांचा मुलगा व आमदार झिशान याच्या कार्यालयासमोर ३ जणांनी त्यांच्यावर गोळीवार केला. ३ ते ४ राऊंड फायरिंग केली होती. यातील एक गोळी बाबा सिद्दीकी यांच्या छातीत लागली होती. त्यांना तातडीनं लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यातील दोन आरोपींना पोलिसांनी काल रात्रीच बेड्या ठोकल्या असून तिसऱ्या आरोपीची ओळख पटली आहे. तिसऱ्या आरोपीची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून सिद्दीकी हत्या प्रकरणातील पुणे कनेक्शन उघड झाला आहे.
गुरमैल सिंग आणि धर्मराज कश्यप अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, तर शिवकुमार नावाचा आरोपी फरार आहे. गोळीबारानंतर शिवानंद रिक्षा पकडून वांद्याला गेला. तिथून त्यानं कुर्ला गाठलं. मग तो पनवेलला गेला. वाहतूक पोलीस आणि रेल्वे पोलिसांच्या अंतर्गत सीसीटीव्हींमधून ही बाब समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांच्या हत्येत सहभागी असलेल्या तिसऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. हा आरोपी पुण्यात पाच ते सहा वर्षांपासून एका स्कॅप डिलरकडे काम करतोय. त्याने धर्मराज नावाच्या १९ वर्षीय आरोपीला काही महिन्यांपूर्वी पुण्यात बोलवून घेतलं होतं.
सिद्दीकी यांच्यावर शिवानंदनं गोळीबार केल्याची माहिती अटक करण्यात आलेल्या दोघांनी दिली आहे. शिवानंदला परराष्ट्रात पळून गेल्याची शक्यता आहे. सिद्दीकी यांची हत्या करणारे चार पैकी तीनजण तुरुंगात एकत्र होते. तिथे बिश्नोई गँगच्या एका शूटरशी त्यांची ओळख झाली. त्यानंतर हे तीनही आरोपी बिष्णोई गँगमध्ये सहभागी झाले. त्यानंतर त्यांना बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसाठी अडीच लाख रूपयांची सुपारी मिळाली. हत्येनंतर त्यांना ५०-५० हजार रुपये मिळणार होते.
सिद्दीकी हत्या प्रकरणातील तिसरा आरोपी शिवा यूपीच्या बहराइच येथील रहिवासी आहे. याबाबत त्याच्या आईने सांगितले की, आम्हाला या घटनेबाबत आज सकाळी माहिती मिळाली. माझा मुलगा पुण्यात भंगारचं काम करायचा. त्यासाठीच पुण्याला जातोय असं त्याने सांगितलं होतं. तो मुंबईत काय करत होता, हे आम्हाला माहिती नाही. तो १८-१९ वर्षांचा आहे. गेल्या आठ-नऊ दिवसांत त्याच्याशी काहीही बोलणं झालं नाही, त्यामुळे तो आता कुठं आहे, आम्हाला माहिती नाही.
संबंधित बातम्या