अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्रीहत्या झाल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. अन्य दोन आरोपींची ओळख पटली असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना झाली आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रविवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पोलिसांनी या घटनेशी संबंधित महत्वाची माहिती दिली आहे.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेशन शाखेची १५ पथके गुन्ह्याचा तपास करत आहेत. तिसरा आरोपी शिवा पनवेलमधून परराज्यात पळून गेल्याचा संशय असून पोलिसांचे पथक परराज्यातही गेले आहे. मुंबई पोलिसांकडून सगळ्या शक्यता गृहित धरून तपास सुरू असल्याचे क्राईम ब्रँचचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी सांगितले. सिद्धिकी हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहभाग आहे की आणखी कुणाचा?याचा सर्वांगाने तपास केला जात आहे. व्हायरल झालेल्या पोस्टची सत्यता आम्ही तपासून बघत असल्याचेही डीसीपी नलावडे यांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की,आरोपींकडून२ पिस्तूल आणि २८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. एका आरोपीला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेबाबत दत्ता नलावडे यांनी सांगितले की, बाबा सिद्धिकी यांना वाय दर्जाची सुरक्षा नव्हती. सिद्धिकी यांच्या सुरक्षेत तीन पोलीस हवालदार होते. पण गोळीबाराप्रसंगी ते काहीही करू शकले नाहीत.
आरोपींकडे मिरचीचा स्प्रे देखील सापडला आहे. आरोपी आधी मिरचीचा स्प्रे बाबा सिद्धिकी यांच्यावर फवारणार होते आणि ते खाली पडल्यावर त्यांच्यावर गोळीबार करणार होते. परंतु तिसरा आरोपी शिवकुमार गौतम याने थेट सिद्धीकी यांच्यावर गोळीबार केल्याने त्यांनी प्लान बदलला, असे डीसीपी नलावडे यांनी सांगितले. ही माहिती आरोपींनीच पोलिस तपासत दिली आहे.
आरोपींचे गुन्ह्याचे रेकॉर्ड तपासले जात आहेत. त्यांच्या मूळ रहिवासी ठिकाणच्या स्थानिक पोलिसांच्या संपर्कात आहोत. त्यांच्या नावे आधी कोणकोणते गुन्हे दाखल आहेत, आरोपी मुंबईत कधी आले, कुठे आले? त्यांना कोणी आश्रय दिला किंवा त्यांना पैसे कोणी पुरवले, या दिशेने आम्ही तपास घेऊन जाणार आहोत, असेही पोलिसांनी सांगितले. बाबा सिद्धीकी यांच्याबरोबर एका कार्यकर्त्याच्या पायाला गोळी लागली. सध्या तो रुग्णालयात असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
संबंधित बातम्या