बाबा सिद्दीकींच्या हल्लेखोरांकडे सापडली २८ जिवंत काडतूसे, आणखी कोण होते निशाण्यावर? वयावरून कार्टात ड्रामा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बाबा सिद्दीकींच्या हल्लेखोरांकडे सापडली २८ जिवंत काडतूसे, आणखी कोण होते निशाण्यावर? वयावरून कार्टात ड्रामा

बाबा सिद्दीकींच्या हल्लेखोरांकडे सापडली २८ जिवंत काडतूसे, आणखी कोण होते निशाण्यावर? वयावरून कार्टात ड्रामा

Published Oct 13, 2024 06:14 PM IST

Baba Siddique Murder : सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींकडे२८जिवंत काडतुसे सापडल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींकडे सापडली २८ जिवंत काडतुसे
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींकडे सापडली २८ जिवंत काडतुसे

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री चार आरोपींनी गोळ्या घालून हत्या केली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. आरोपींच्या वकिलांकडून आरोपी अल्पवयीन म्हणजे १७ वर्षाचा असल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला. मात्र सरकारी वकिलांनी त्याचे आधार कार्डवरील वय १९ असल्याचे न्यायालयाच्या निर्देशनास आणून दिले. 

आरोपींकडून २८ जिवंत काडतूसे सापडली आहेत. त्यांच्या निशाण्यावर फक्त बाबा सिद्धीकी होते की, अजून कोणाला त्यांना मारण्याचा हेतू होता,  याचा पोलीस शोध घेत आहेत.  दरम्यान यातील आरोपी धर्मराज राजेश कश्यप (वय १९) या याची वयाची चाचणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तर गुरमैल बलजीत सिंह (वय २३) याला २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच यातील दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. शिव कुमार गौतम उर्फ शिवा (२०) आणि मोहम्मद झीशन अख्तर, असं या आरोपींची नावे आहेत. यातील झीशन अख्तर यानेच हत्येसाठी हत्यारे पुरवल्याचा संशय पोलिसांना आहे.

आरोपींकडे २८ जिवंत काडतुसे -

सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींकडे २८ जिवंत काडतुसे सापडल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे.  सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आरोपी आणखी कुणाची हत्या करणार होते का? हे तपासायचं आहे. यात आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे का, याचा तपास करावा लागणार आहे. राज्यात निवडणुका तोंडावर आल्या आहेत. आणखी कुणी यांच्या निशाण्यावर आहे का? हे तपासायचं आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली. आरोपींनी पूर्ण प्रशिक्षण घेऊन नियोजित पद्धतीने हत्या केली आहे. त्यांना जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळाल्यास योग्य दिशेने तपास करता येईल, असे सरकारी वकिलांनी म्हटले.

आरोपीच्या वयावरून ड्रामा -

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील धर्मराज कश्यप या आरोपीला न्यायमूर्तींनी वय विचारले असता त्याने आपले वय १७ असल्याचे सांगितले. तसेच त्याच्या वडिलांनीही तो अल्पवयीन असल्याची ट्रिटमेंट मिळावी, अशी मागणी केली. त्यानंतर आरोपीचं नेमकं वय किती? हे तपासण्यासाठी न्यायमूर्तींनी अल्पवयीन आरोपीचं आधारकार्ड मागवलं. आधारकार्डनुसार आरोपीचं वय १९  असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यानंतर त्याच्या वयाची चाचणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

तपासासाठी १० टीम गठित -

सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, या प्रकरणाच्या तपासासाठी १० पथके तयार केली असून आरोपी पुण्याला काय करत होते, कुठे राहत होते, याचा तपास करायचा आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर