Indurikar Maharaj : लिंगभेदी विधानामुळं इंदुरीकर महाराज गोत्यात; औरंगाबाद न्यायालयाचा पोलिसांना थेट आदेश
Indurikar Maharaj : प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज तथा निवृत्ती महाराज देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Indurikar Maharaj : मुलगा व मुलगीच्या जन्माबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून लिंगभेदाला व अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी कायद्याच्या कचाट्यात अडकलेले कीर्तनकार निवृत्तीमहाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराजांच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
इंदुरीकर महाराज हे त्यांच्या खास शैलीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कीर्तनाला संपूर्ण राज्यातून मोठी मागणी असते. खास ग्रामीण शैलीत ते श्रोत्यांशी संवाद साधतात आणि लोकांचं प्रबोधन करतात. अशाच एका प्रवचनाच्या वेळी त्यांनी मुलगा आणि मुलीच्या जन्माविषयी एक विधान केलं होतं. सम तारखेला शरीरसंबंध ठेवल्यास मुलगा होतो आणि विषम तारखेला शरीरसंबंध ठेवल्यास मुलगी होते, असं ते म्हणाले होते.
इंदुरीकरांचं हे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर मोठा गदारोळ सुरू झाला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्यांच्या विरोधात मोहीमच उघडली. त्यांच्या विरोधात अंनिस व जिल्हा शल्य चिकित्सकांनी पोलीस तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण कनिष्ठ न्यायालयात गेलं. कनिष्ठ न्यायालयानं या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात इंदुरीकरांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. सत्र न्यायालयानं हा गुन्हा रद्द केला.
सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती व राज्य सरकारनं उच्च न्यायालयात धाव घेतली. हे प्रकरण औरंगाबाद खंडपीठापुढं होतं. त्यावर आज निकाल देत न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं इंदुरीकरांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
विभाग