काही दिवसांपूर्वी विहिरीत पडून ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता मोठा खुलासा झाला असून सर्वांनाच धक्का बसला आहे. दीराचा बदला घेण्यासाठी तसेच संपत्तीसाठी हडपण्यासाठी सख्ख्या चुलतीने चिमुकल्याला विहिरीत टाकून त्याचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माटेगाव येथे घडली होती. काही दिवसापूर्वी येथे ४ वर्षाच्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. विहिरीजवळ खेळताना तो पाण्यात पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र ही हत्या असल्याचे समोर आले आहे. या चिमुकल्याची हत्या त्याच्या सख्ख्या काकूनेच केल्याचे उघड झाले आहे. तिने बदला घेण्यासाठी तसेच संपत्तीच्या लालसेने मुलाचा खून केला आहे. पोलिसांनी आरोपी काकूला अटक केली असून सुनीता गणेश जाधव असे या निर्दयी काकूचे नाव आहे. तसे सार्थक असे मृत चिमुकल्याचे नाव होते.
मिळालेल्या माहितीनुसार माटेगावात शेतातील वस्तीवर गणेश हिरामण जाधव आणि सागर हिरामण जाधव हे दोघे सख्के भाऊ एकत्र राहतात. दोघांना वडिलोपार्जित ६ एकर जमीन आहे. सुनिता ही मोठा भाऊ गणेश याची पत्नी आहे. गणेश व सुनिताला २ मुले आहेत तर लहान भाऊ सागरला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. काही दिवसापूर्वी सागरचा मुलगा सार्थक याने खेळत असताना गणेशच्या मुलाच्या डोळ्यात चुना टाकला होता. यामुळे त्याचा डोळाच निकामी झाला होता.
आपल्या मुलाला अधू केल्याचा राग सुनिताच्या मनात होता. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच सागरच्या पत्नीचे ऑपरेशन करून तिचे गर्भाशय काढून टाकले होते. म्हणजे, त्याला भविष्यात मूळबाळ होणार नव्हते. याची जाणीव सुनीताला असल्याने सागरच्या वाट्याची जमीन हडपण्यासाठी तसेच मुलाचा डोळा निकामी केल्याचा बदला घेण्यासाठी तिने सार्थकची हत्या केली.