L&T Sea Bridge Marathon 2024: मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतू आजपासून (शनिवार, १७ फेब्रुवारी) रविवारी दुपारपर्यंत सुमारे १४ तास बंद ठेवण्यात येणार आहे. एल अॅण्ड टी एमएमआरडीएच्या सहकार्याने आयोजित केलेल्या मॅरेथॉनमुळे अटल सेतू पुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (१७ फेब्रुवारी) रात्री ११. ०० वाजल्यापासून रविवारी (१८ फेब्रुवारी) दुपारी ०१.०० वाजेपर्यंत शिवडी-न्हावा शेवा सी लिंकवरील वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांना सी लिंकवर जाण्यास बंदी असेल. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
दरम्यान, १८ फेब्रुवारी पहाटे ४.०० वाजल्यापासून दुपारी १२.०० वाजेपर्यंत मॅरेथॉन असेल. मॅरेथॉन दरम्यान वाहतुकीत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून सुरळीत प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी १७ फेब्रुवारी रोजी रात्री ११:०० ते १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ०१:०० वाजेपर्यंत सी लिंकवर वाहनांच्या प्रवेशास बंदी असेल. उरण ते अटल सेतूकडे जाणाऱ्या वाहनांना इच्छित स्थळी जाण्यासाठी गव्हाण फाटा, उरण फाटा आणि वाशी मार्गे जावे लागेल.
पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाने (मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग) प्रवास करावा लागेल. तर, बेलापूर आणि वाशी मार्ग वापरून इच्छित स्थळी पोहोचावे लागेल. जेएनपीटीहून मुंबईकडे जाणारी हलकी वाहनांना मुंबईतील त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी गव्हाण फाटा आणि वाशी खाडी पूल मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवा वाहने या वाहतूक नियंत्रण सूचनांमधून तसेच मॅरेथॉनमध्ये सहभागी वाहनांना सूट देण्यात आली आहे. एल अँड टी सी ब्रिज मॅरेथॉन २०२४ चे उद्घाटन १८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. जवळपास ५ हजार उत्सुक धावपटू, बहुसंख्य मुंबईतील रहिवाशांनी या मेगा इव्हेंटसाठी आधीच नोंदणी केली आहे.
संबंधित बातम्या