Pune lonikand Police station Crime : पुण्यात लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस निरीक्षकांच्या हप्तेखोरीला कंटाळून एका बारमालक असलेल्या तरुणाने पोलिस ठण्यातच स्वत:ला पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे याच प्रकारची आणखी एक घटना काही दिवसांपूर्वी वाघोली येथे घडली होती. यात पोलीस चौकीच्या बाहेरच स्वतःला पेटवून घेत तरुणाने आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असताना पुन्हा असाच प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्रासलेल्या बारमालकाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला रोखल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना सोमवारी दुपारी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सत्यम गावडे असे स्वत:ला पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सत्यम गावडेचा वाघोली येथे बार असून तो नियमानुसार रात्री दीड नंतर बंद करणे गरजेचे असतांना हा बार रात्री उशिरापर्यंत बार सुरू असल्याचे सांगून महिनाभर बार बंद ठेवावा लागेल अशी तंबी लोणीकंद पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली. एवढेच नाही तर त्याला पोलीस आयुक्तांचे आदेश आहेत, असे देखील सांगण्यात आले आणि बार बंद ठेवावा लागेल असे म्हणत एका महिला अधिकाऱ्याने दमबाजी केल्याचा आरोप देखील सत्यम गावडे या तरुणाने केला.
बार जर महिनाभर बंद ठेवला तर आर्थिक नुकसान होण्याच्या भीतीने या तरुणाने लोणीकंद पोलिस ठाण्याच्या बाहेरच स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. दरम्यान या ठिकाणी उभ्या असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यांला हे वेळीच लक्षात आल्याने त्याने तातडीने सत्यमला रोखल्याने दुर्घटना टळली. या घटनेचा व्हिडिओ सत्यमच्या मित्राने मोबाईलमध्ये काढले. मात्र पोलिसांनी त्यांचे मोबाईल जप्त करून सर्व व्हिडिओ डिलीट केल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे.
हा बारमालक तरूणांकडून हप्ता म्हणून पोलीस दर महिन्याला पैसे घेत होते असा आरोप देखील या तरुणाने केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा हप्ता पोलिस वाढवून मागत होते. मात्र, तो दिला नसल्याने पोलिस त्रास देत असल्याचे देखील या तरुणाचे म्हणणे आहे. पोलिस रात्री बे रात्री येऊन दुकानातील कर्मचाऱ्यांना घेऊन पोलिस ठाण्यात डांबून ठेवत होते. खोटे खटले दाखल करत होते. ऐवढेच नाहीतर हॉटेल बंद करण्याची देखील धमकी देत होते.
तब्बल २ महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. सोमवारी मध्यरात्री १च्या सुमारास महिला पोलिस अधिकारी त्याच्या दुकानात येत बंद असलेले दुकान त्यांनी उघडे करण्यास सांगितले. यानंतर २ नंतरही बार सुरू का ठेवतो असे म्हणत त्याला हॉटेल बंद करण्याची धमकी दिली. यामुळे कंटाळून हे पाऊल उचलल्याचे या तरुणांचे म्हणणे आहे. या संदर्भात पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असताना त्यांच्या कडून उत्तर मिळाले नाही.