Pune Crime News : पुण्यात सदाशिव पेठेत एका तरुणीवर काही दिवसांपूर्वी एकतर्फी प्रेमातून कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. या घटनेने खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतांना या घटनेसारखी एक घटना सोमवारी शुक्रवार पेठेतील सुभाषनगर परिसरात दुपारी घडली. एक तरुणी बोलत नसल्याच्या कारणामुळे दोघांनी तिच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका महिलेने प्रसंगावधान राखत, आरडा ओरडा केल्याने हल्लेखोर दोघे पळून गेले. मात्र, त्यांनी जातांना नगरिकांना कोयत्याचा धाक दाखवून तो रस्त्यात फेकून दिला.
महेश सिद्धप्पा भंडारी (वय २२, रा. जनता वसाहत) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला तळजाई परिसरातून सोमवारी रात्री अटक करण्यात आली. तर त्याचा दूसरा साथीदार फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सुभाषनगर परिसरातून पीडित दुपारी तरुणी व तिची मैत्रीण ही रस्त्यावरून जात असतांना दुचाकीवरुन दोघे आले. त्यापैकी एकाने तरुणीवर कोयता उगारला. यानंतर तरुणीने व तेथून जाणाऱ्या एका महिलेने आरडाओरडा केल्यानंतर दोघेही तरुण दुचाकीवरुन फरार झाले. आरोपींनी रस्त्यावरून जात असतांना मोठा गोंधळ घातला. नागरिकांना घाबरवत त्यांनी रस्त्यावर कोयता फेकून दिला. यानंतर दोघेही दुचाकीवरून फरार झाले. दरम्यान, फरार झालेल्या मुलांचा पोलिस शोध घेत असून मुलगी बोलत नसल्याच्या रागातून त्यांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे.
दरम्यान, खडक पोलिसांनी एका आरोपी तरुणाला सोमवारी रात्री अटक केली. तो तळजाई टेकडी परिसरात लपून बसला होता. त्याने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तरुणी बोलत नसल्याच्या रागातून त्याने हा हल्ला केल्याचे संगितले. दोघांवर रात्री उशिरा खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित तरुणी ही एका कॉलेजमध्ये शिक्षण घेते. तर आरोपी महेश हा जनता वसाहतीत राहतो. दोघेही एकमेकांना ओळखतात. पीडित तरुणी ही तिच्या मैत्रिणींसोबत दुपारी १२.३० च्या सुमारास सुभाषनगर येथील गल्ली क्रमांक ६ येथून जात होती. यावेळी महेश व त्याचा मित्र दुचाकीवरुन तेथे आले. महेशच्या हातात कोयता होता. दोघे बोलत असताना त्यांच्यात वादावादी झाली. यातून रागाच्या भारत महेशने मुलीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी तेथून जाणाऱ्या एका महिलेने हा प्रकार पाहिल्याने तिने आरडा ओरडा केला. यामुळे नागरिक तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी हातातील कोयता हवेत फिरवून पळ काढला. यानंतर एकाला कोयता फेकून मारत पळ काढला. या ची माहिती नागरिकांनी खडक पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी आल्यावर नागरिकांनी आरोपी आणि त्यांच्या गाडीचे फोटो पोलिसांना दिले. यानंतर आरोपी तरुण जनता वसाहतीमधला असल्याचे समजले. पोलिसांनी रात्री त्याला अटक केली.