जाळीतल्या कांद्याला व्यापारी भाव देईनासे झाल्यानं दरवर्षी साठवलेला कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतो. यंदाही काहीसं असंच चित्र राज्यात पाहायला मिळतंय.
घरातल्या दैनंदिन वापरात ज्याचा सर्वाधिक वापर होतो त्यापैकी एक म्हणजे कांदा. मात्र दरवर्षी कांद्याचे पडलेले भाव आणि त्यामुळे मेताकुटीला आलेला शेतकरी हे समिकरण पाहायला मिळतं. यंदाही अशाच प्रकारचा अनुभव राज्यातले शेतकरी घेत आहेत. यंदाही पावसाळा सुरू होण्यापूर्वी जाळीतला कांदा शेतकऱ्याने बाजारात आणलाय खरा, मात्र त्या कांद्याला व्यापारी भाव देईनासा झाल्यानं, आता या कांद्याचं करायचं काय? अशा विचारात आता शेतकरी पडला आहे. जाळीतला हा साठवलेला कांदा बाजारात आणल्यावर शेतकऱ्याला बाजारात त्या कांद्याच्या प्रतिप्रमाणे एक रुपया ते पाच रुपये किलोचा भाव मिळताना दिसतंय. दरवर्षी थोड्याफार फरकानं हे असंच चित्र असलं तरी आता मुद्दलही निघत नसल्यानं करायचं काय या चिंतेत शेतकरी पडला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
त्याबाबत आपली व्यथा व्यक्त करताना नाशिकचे कांदा उत्पादक शेतकरी गणेश अडेकर म्हणाले की, अनेक ठिकाणी बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले गेले त्यामुळे उत्पादकता कमी झाली सोबतच मध्यंतरी आलेल्या अवकाळीने पीक जोमात असताना नुकसान केले. आता पिकाची प्रतवारी काही प्रमाणात का होईना खालावली आहे. बाजार भावाकडून अपेक्षा होती मात्र आता तिथे सुद्धा निराशा आली आहे. शेतात असलेला कांदा जमिनीतून काढून बाजारात नेण्यापर्यंतचा खर्च मुळातच प्रति किलो पाच ते सात रुपये इतका पडतोय आणि मिळणारा भाव एक रुपया ते पाच रुपये आहे त्यामुळे आता काय करायचं असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला आहे.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे ठोक व्यापारी सांगतात की, चांगला कांदा हा तीन रुपये ते सात रुपये किलो प्रमाणे खरेदी केला जात आहे तर कमी प्रतीचा कांदा एक रुपये किलो पासून दोन-अडीच रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. कांद्याला दर वर्षी गुजरात मधून चांगली मागणी असते त्यामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फायदा होतो मात्र यंदा गुजरातमधून मागणी अत्यल्प आहे. सध्या हे भाव पुढील काही महिने तरी असेच राहतील असा बाजाराचा अंदाज आहे.
का मिळतो शेतकऱ्याला भाव कमी?
दरवर्षी जाळीतला कांदा अर्थात साठवलेला कांदा पाऊस सुरु होण्याच्या आधी शेतकरी जाळीतनं काढतो आणि तो कांदा बाजारसमितीत आणतो. मात्र जाळीत हा कांदा काही काळ साठलेला असल्याने जाळीतल्या खालच्या भागातला कांदा खराब स्थितीत असतो. हा कांदा काही दिवसातच खराब होतो किंवा सडतो. हा कांदा नाशवंत प्रकारात लवकर जात असल्याने व्यापारी या कांद्याकडे पाठ फिरवतो आणि शेतकऱ्यांच्या मालाचा भाव पडलेला पाहायला मिळतो.