Alibaug Rename : औरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता अलिबागचंही होणार नामांतर! सूचवलं नवीन नाव-assembly speaker rahul narvekar wrote letter to cm eknath shinde for change name alibaug ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Alibaug Rename : औरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता अलिबागचंही होणार नामांतर! सूचवलं नवीन नाव

Alibaug Rename : औरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता अलिबागचंही होणार नामांतर! सूचवलं नवीन नाव

Apr 04, 2024 07:19 PM IST

Alibaug Rename : अलिबाग शहराचं नाव बदलावं, अशी मागणी केली जात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रातून अलिबागचे नामांतर करण्याची मागणी केली आहे.

अलिबागचं नाव बदलण्याची मागणी
अलिबागचं नाव बदलण्याची मागणी

Alibaug Name Change : राज्यातील उस्मानाबाद,औरंगाबादया शहरांपाठोपाठ अहमदनगर जिल्ह्याचेही नामकरण करण्याची घोषणा ताजी असताना आता आणखी एका शहराचं नाव बदलण्याची मागणी केली जात आहे. आता अलिबाग शहराचं नाव बदलावं, अशी मागणी केली जात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul narvekar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm Eknath shinde) यांना लिहिलेल्या पत्रातून अलिबागचे नामांतर करण्याची मागणी केली आहे. अलिबाग शहर तसेच तालुक्याचे नामकरण करण्याची मागणी नार्वेकर यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे.

अलिबागचं नाव बदलून ‘मायनाक नगरी’ करावं, अशी मागणी राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रातून केली आहे. अलिबागच्या नामांतराबरोबरच अलिबाग शहरात मायनाक भंडारी यांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणीही नार्वेकर यांनी केली आहे. दरम्यान अलिबाग शहराच्या नामांतरास अलिबागवासीयांकडूनच जोरदार विरोध होत आहे.

राहुल नार्वेकरांनी पत्रात काय लिहिलंय?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याच्या उभारणी कार्यात सागरी संरक्षण आणि सागरी मोहिमांना खूप मोलाचं स्थान आहे. शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने स्वराज्यासाठी बलाढ्य आरमाराची उभारणी केली. महाराजांनी समुद्रमार्गे स्वराज्याला धोका उद्भवल्यास सागरी सीमेचे संरक्षण करण्याची जबाबदारी कोकणातील भंडारी समाजाचे नेतृत्व करणारे मायनाक भंडारी या शूर लढवय्याकडे सोपवली होती. अलिबाग येथील खांदेरी-उंदेरी बंदरावरील किल्ला आणि तेथील मायनाक भंडारी यांचा पराक्रम,चिवट संघर्ष यापुढे इंग्रजांना देखील नमते घ्यावे लागले होते. स्वराज्याचे आरमार आणि त्यासंदर्भातील इतिहास यातील मायनाक भंडारी यांच्या या पराक्रमाचा ऐतिहासिक संदर्भ घेता अलिबाग शहरासह तालुक्याचे ‘मायनाक नगरी’हे नामकरण करावे,अशी मागणी राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिलिलेल्या पत्रात केली आहे.

काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर, मुख्य सचिव प्रकाश कांबळी, सहसचिव वैभव तारी आणि प्रवक्ते शशांक पाटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भेटून त्यांच्याकडे अलिबाग शहराच्या नामांतराची मागणी केली होती.तसेच मायनाक भंडारी यांचे अलिबाग शहरात भव्य स्मारक उभारण्यात यावे,  अशी मागणीही भंडारी समाजाने केली आहे. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळाने राहुलनार्वेकर यांना सोपवले होते.

त्यानंतर राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अलिबाग नामकरणाची मागणी केली. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, ही मागणी अतिशय रास्त असून, त्याची शासन स्तरावरून उचित दखल घेण्यात यावी आणि नामकरण,  स्मारक उभारणी याद्वारे या मागणीची पूर्तता व्हावी.

 

अलिबागचे नाव'मायनाक नगरी'करण्याची मागणी नार्वेकरांनी केली. परंतु विधान सभा अध्यक्षांच्या या मागणीला अलिबागमधून विरोध होऊ लागला आहे. येत्या काही दिवसात अलिबाग नामांतरावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Whats_app_banner