राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून जागावाटपासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे. अशातच आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यातच पुण्यात खेड शिवापूर टोल नाक्यावर ५ कोटींची रोकड सापडल्याची घटना ताजी असतानाच आता हडपसरमध्ये २२ लाखांची रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता काळात कुठलेही गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. प्रत्येक शहरातील नाक्यावर वाहनांची तपासणी केली जात आहे. या नाकाबंदी दरम्यान पुण्यातील खेड-शिवापूर परिसरात सोमवारी रात्री एका गाडीतून जवळपास पाच कोटींची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली होती.
पाच कोटींची रक्कम आढळल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यातील हडपसर रोडवर मंगळवारी दुपारच्या सुमारास एका कारमध्ये तब्बल २२ लाख रुपयांची रोकड सापडली आहे. हडपसर सोलापूर रोडवर चेकिंग करताना एका गाडीमध्ये ही रक्कम सापडली. पोलिसांनी जप्त केलेली रक्कम किराणा माल दुकानाची होलसेल व्यापाऱ्याचे बिल असल्याचे सांगण्यात आले आहे. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.
दरम्यान खेड शिवापूर टोल नाक्यावर पाच कोटी सापडले होते. ही गाडी ही सत्ताधारी आमदाराची असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पुण्यातील हडपसर भागात २२ लाखांची रोकड सापडली आहे.
निवडणूक आचारसंहितेमुळे वाहनांची कडक तपासणी केली जात आहे. याच तपासणीच्यावेळी हडपसर पोलिसांना चेकिंग करताना एका गाडीमध्ये मोठी रक्कम सापडली आहे. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत. आचारसंहितेमुळे पोलिसांकडून वाहनांची कडक तपासणी करण्यात येतेय. पोलिसांकडून या गाडीची चेकिंग सुरू असताना त्यामध्ये ही रक्कम आढळून आली.
दरम्यान, पुण्यातील पाच कोटी रक्कम जप्ती प्रकरणात पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नसल्याचा दावा पुणे ग्रामीण एसपी पंकज देशमुख यांनी केला आहे. सोमवारी खेड शिवापूर नाकाबंदीत जप्त केलेली रोकड नियमानुसार आम्ही आयकर विभागाला हस्तांतरित केली असून पुढील कारवाई सुरू आहे, असं देशमुख यांनी सांगितलं.