Vidhan Sabha Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून राज्यभरात प्रचार सभांचा धडाका सुरु आहे. प्रचार सभांमधून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शिरूर मतदारसंघाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करुन मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत शिरुर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे ही घटना घडली आहे.
अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून त्याला विवस्त्र करुन मारहाण केलं. यानंतर त्याच्यासमोरच एका महिलेलाही विवस्त्र करण्यात आलं. दोघांचे फोटो काढण्यात आले, असा आरोप अशोक पवार यांनी केला आहे.
अशोक पवार यांच्या मुलाला बेदम मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. ऋषीराज पवार असं अशोक पवार यांच्या मुलाचं नाव आहे. ऋषीराज हे घोडगंगा साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. ऋषीराज पवारांच्या अपहरणाची बातमी मतदारसंघात वाऱ्याच्या वेगाने पसरली, यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जमा झाले आहेत.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत अॅड.असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेत या घटनेची माहिती दिली आहे. तसेच अॅड.असीम सरोदे यांनी ऋषीराज पवारची एक व्हिडीओ क्लीप दाखवली आहे. त्यामध्ये अपहरण कशा प्रकारे झाले आणि अपहरण झाल्यानंतर आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप व्हिडीओ क्लीपमध्ये ऋषीराज पवार याने केला आहे.
व्हिडिओमध्ये ऋषीराज पवार सांगत आहे की, आमच्यासोबत प्रचारात फिरत असलेल्या भाऊ कोळपे नामक तरुणानं काही लोकांशी मिटिंग करायची असल्याचं सांगून मला घेऊन गेला. त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही दोघं माझ्या गाडीतून निघालो. चालकानं गाडी मांडवगण वडगाव रोडला एका ठिकाणी नेली.
तिथं कोळपेनं सांगितलं की, पुढे चारचाकी जाणार नाही. त्याने तिथे आधीच दोन दुचाकी बोलावून घेतल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मला एका बंगल्यापर्यंत नेलं. बंगल्यातील एका खोलीत बसल्यावर तीन जण शिरले. त्यांनी माझे हातपाय पकडले व माझ्या शर्टची बटणं उघडली, त्यानंतर मी त्याला विरोध केला.
तुम्ही असे का करत आहात, पैसे हवे असतील तर आपण बोलू. त्यानंतर त्यांनी माझ्या तोंडावर एक कापड टाकलं आणि माझा गळा दाबला, मला मारुन टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एका पिशवीतून एक दोरी काढली आणि आम्हाला हा व्हिडिओ पाहिजे असं त्यांनी मला सांगितलं. तसंच यासाठी आम्हाला १० कोटी रुपयांची ऑफर आल्याचंही स्पष्टपणे सांगितलं. त्यानंतर माझ्या जीवाला घाबरुन मी ते सांगतील ते करण्यासाठी तयार झालो. त्यानंतर त्यांनी माझे कपडे काढले आणि चौथ्या माणसानं एका महिलेला आणलं. त्यानंतर भाऊ कोळपे नामक व्यक्तीनं तिघांना बाहेर काढलं. त्यानंतर त्या महिलेसोबत बनावट व्हिडिओ काढला. या व्हिडिओत तो संबंधित महिलेला सूचना देताना दिसतो आहे. नंतर त्यानं महिलेला कुठे पाठवून दिलं मला माहिती नाही.