मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक, ज्येष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव म्हणून आज नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात प्रधाव सचिव असलेले आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह यांची त्या जागा घेतील. दरम्यान, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नवीन नियुक्ती होईस्तोवर या पदाचा कार्यभार भिडे यांच्याकडेच राहणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर रोजी आझाद मैदान येथे आयोजित भव्य शपथविधी समारंभात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयातील नवीन टीम तयार करण्यास सुरूवात केली आहे. आयएएस अधिकारी श्रीकर परदेसी यांची मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदी नुकतीच नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आज ज्येष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आश्विनी भिडे या १९९५ च्या बॅचच्या महाराष्ट्र कॅडरच्या आयएएस अधिकारी आहेत. यूपीएससीच्या परीक्षेत भिडे या राज्यात महिला उमेदवारांमध्ये सर्वप्रथम आल्या होत्या. भिडे यांना सनदी सेवेचा एकूण २५ वर्षांचा अनुभव आहे. भिडे यांनी १९९७-९९ या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर १९९९-२००० या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, २०००-२००३ दरम्यान नागपूर जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, २००४-२००८ दरम्यान राज्यपालांच्या उपसचिव आणि त्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA)च्या अतिरिक्त महानगर आयुक्त तसेच मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून काम केले आहे. २०१५ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने भिडे यांची MMRCच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली होती.
मुंबईत शहरात मेट्रोचे जाळे निर्माण करणे जिकीरीचे काम होते. परंतु भिडे यांनी अनेक अडचणींवर मात करत फार जिद्दिने हा प्रकल्प पुढे नेला होता. मेट्रो-३ च्या संचालदकपदाची जबाबदारी भिडे यांच्याकडे देण्यात आली होती.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळात आरे वसाहतीमधील मेट्रो-३ च्या कारशेडच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि अश्विनी भिडे यांच्यादरम्यान तीव्र मतभेद निर्माण झाले होते. गोरेगावमधील आरे येथून मेट्रो कारशेड हलवल्यास मेट्रो प्रकल्पच होणार नसल्याची भूमिका भिडे यांनी घेतली होती. त्यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी अश्विनी भिडेंवर टीकादेखील केली होती.
संबंधित बातम्या