Shaktipeeth Expressway : राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाला जोरदार विरोध होत आहे. कोल्हापूरनंतर आता राज्यातील अन्य जिल्ह्यातूही या महामार्गाला विरोध केला जात आहे. कोल्हापूरनंतर नांदेडमधील शेतकऱ्यांनीही शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर आणि हदगाव तालुक्यातून हा महामार्ग जातो. हा भाग बागायती शेतीसाठी ओळला जातो. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. यानंतर आता भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनीही शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत काम थांबवण्याची मागणी केली आहे.
नागपूर-रत्नागिरी आणि नागपूर- तुळजापूर हे दोन राष्ट्रीय महामार्ग असताना हा महामार्ग कशासाठी असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. नांदेड जिल्ह्यातील दोन तालुक्यातून हा महामार्ग जाणार आहे. यासाठी हदगाव तालुक्यातील१७ आणिअर्धापूर तालुक्यातील ५ गावातील शेकडो हेक्टर बागायती जमिनीचे अधिगृहन केले जाणार आहे. हा महामार्ग झाल्यास अनेक शेतकरी भूमिहीन होणार असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहून आता भाजप नेते व खासदार अशोक चव्हाण यांनीही महामार्गाला विरोध दर्शवला आहे. शक्तीपीठाचे काम बऱ्याच जिल्ह्यात थांबवले आहे तर नांदेडमध्येही शक्तिपीठाचे काम थांबले पाहिजे. जबरदस्तीने शेतकऱ्यांची जमीन अधिगृहित करू नये. शक्तिपीठाचे काम थांबवण्यासाठी मी सरकारशी बोलणार असल्याचे चव्हाण म्हणाले.
अनेक जिल्ह्यातून या महामार्गाला विरोध होत आहे.कोल्हापूरातील शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनदेखील करण्यात येणार आहे. या महामार्गाला सत्ताधारी नेत्यानीही विरोध केला आहे. महामार्गाच्या भूमीसंपादनाला सुरुवात झाल्यानंतरच या महामार्गाला विरोध होत आहे.
वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. या महामार्गामुळं २१ तासांचा वेळ कमी होणार असून ११ तासांत प्रवास पूर्ण होणार आहे. एकूण ८०२ किलोमीटरचा रस्ता प्रस्तावित असून या प्रकल्पासाठी ८६,००० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.
दरम्यान कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी या महामार्गाला विरोध करत राज्य सरकारला घेरलं आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.या महामार्गाची आवश्यकताच नाही अशी भूमिका राजू शेट्टींनी घेतली असून याविरोधात उद्या (१८ जून) कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शक्तिपीठ महामार्ग विरोधात प्रचंड मोर्चा काढण्यात येणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
संबंधित बातम्या