Ashok Chavan : अशोक चव्हाण यांनी पक्ष व आमदारकीही सोडली; काँग्रेसला मोठा झटका
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ashok Chavan : अशोक चव्हाण यांनी पक्ष व आमदारकीही सोडली; काँग्रेसला मोठा झटका

Ashok Chavan : अशोक चव्हाण यांनी पक्ष व आमदारकीही सोडली; काँग्रेसला मोठा झटका

Feb 12, 2024 01:33 PM IST

Ashok Chavan Resignation News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा असून ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Ashok Chavan may join BJP
Ashok Chavan may join BJP

Ashok Chavan Resignation : राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांनी तस पत्र लिहिलं आहे. तसंच, त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला असून ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. काँग्रेससाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर झालेल्या विश्वास ठरावाच्या वेळी अशोक चव्हाण यांच्यासह काही आमदार उपस्थित होते. तेव्हापासूनच अशोक चव्हाण यांच्याबद्दल सतत काही ना काही चर्चा सुरू होती. काही महिन्यांपूर्वी अशोक चव्हाण यांनी स्वत: ही चर्चा फेटाळून लावली होती. मात्र, आज त्या चर्चेवर शिक्कामोर्तब झालं आहे.

राजीनामा देण्याआधी अशोक चव्हाण हे नॉट रिचेबल झाले होते. त्यांचे स्वीय सहाय्यक व स्वीय सचिव यांचेही फोन लागत नव्हते. त्यामुळं शंकेला बळ मिळालं होतं. चव्हाण यांच्यासोबत नांदेड जिल्ह्यातील व मराठवाड्यातील एक-दोन पाच ते सात आमदारही भाजपमध्ये प्रवेश करतील, असं सांगितलं जात आहे. चव्हाण यांच्या सोबत भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे मुंबईतील नेते व माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे व नसीम खान यांच्या नावाचीही चर्चा आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले…

अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाच्या चर्चेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केलं. 'काँग्रेसमधील अनेक नेते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. ज्या पद्धतीनं गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू आहे, त्यामुळं त्यांची तिथं घुसमट होत आहे. त्यामुळं लोकांमध्ये काम करणारे, तळागाळाशी नातं असलेले नेते भाजपमध्ये येऊ पाहत आहेत. देशभरात असं चित्र आहे, असं फडणवीस म्हणाले.

लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

आगामी लोकसभा निवडणुकीत ४०० हून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य भाजपनं ठेवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: संसेदत तसं बोलून दाखवल्यामुळं भाजप त्याबद्दल अधिक गंभीर असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्या दृष्टीनं ठिकठिकाणी प्रबळ उमेदवारांचा शोध सुरू झाला आहे. लोकसभेच्या दृष्टीनं महत्त्वाचं राज्य असलेल्या महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात भाजपकडं तुल्यबळ उमेदवार नाही. तिथं विरोधी पक्षातील मातब्बर नेते येतील का याची चाचपणी सुरू आहे. नांदेड जिल्ह्यात या प्रयत्नांना यश आल्याचं बोललं जातं.

मुंबईतील माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे मुंबईतील माजी नगरसेवक जगदीश अमीन कुट्टी आणि राजेंद्र नरवणकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार आशिष शेलार यांनी या दोघांचं पक्षात स्वागत केलं.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर