काँग्रेस अशोक चव्हाणांनी सोडली, खुलासे करण्याची वेळ 'या' आमदारांवर-ashok chavan resignation vijay wadettiwar bhai jagtap and other mlas denies reports of joining bjp ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  काँग्रेस अशोक चव्हाणांनी सोडली, खुलासे करण्याची वेळ 'या' आमदारांवर

काँग्रेस अशोक चव्हाणांनी सोडली, खुलासे करण्याची वेळ 'या' आमदारांवर

Feb 12, 2024 08:00 PM IST

Vijay Wadettiwar on Ashok Chavan Resignation : अशोक चव्हाण यांच्या मागोमाग काँग्रेस सोडण्याचं वृत्त विजय वडेट्टीवार यांच्यासह इतर काँग्रेस आमदारांनी फेटाळून लावलं आहे.

Bhai Jagtap, Vijay Wadettiwar, Vishwajeet Kadam, Yashomati Thakur
Bhai Jagtap, Vijay Wadettiwar, Vishwajeet Kadam, Yashomati Thakur

Ashok Chavan Resignation Side Effects : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. अशोक चव्हाण यांच्या सोबत अनेक आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यापैकी काही नावंही मीडियामध्ये येत आहेत. त्यामुळं या सगळ्या आमदारांनी खुलासे सुरू केले आहेत.

अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री व अमरावतीच्या तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर, सांगलीतील आमदार विश्वजीत कदम, भाई जगताप यांचीही नावं वृत्तवाहिन्यांवर चर्चिली जात होती. या सर्वांनी काँग्रेस सोडण्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे.

माझ्याबद्दलच्या बातम्या या वावड्या - विजय वडेट्टीवार

माझ्याबद्दल ज्या वावड्या उठल्या आहेत, त्यात तथ्य नाही. मी आता मतदारसंघात फिरतो आहे. चव्हाण साहेब त्यांच्या जाण्याचं कारण स्पष्ट करतील. त्यांची चौकशी होणार होती असं आम्हाला कळतंय. ते स्पष्टपणे काही समोर आलेलं नाही, असं वडेट्टीवार म्हणाले.

माझी शेवटची यात्रा काँग्रेसच्या तिरंग्यातून निघेल - भाई जगताप

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनीही ट्वीट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'भाई जगताप काँग्रेस सोडणार अशा वावड्या काही नतद्रष्ट पसरवत आहेत. त्यांना सांगू इच्छितो की माझ्या विद्यार्थी दशेपासून खांद्यावर घेतलेला हा काँग्रेसचा तिरंगा मी कधीही खाली ठेवणार नाही. पद, लालच आणि फायद्याकरिता माझा पिंड बनलेला नाही आणि मी कोणाच्या बापाला घाबरतही नाही. अनेक वादळ आली आणि गेली, काँग्रेस कोणीही संपवू शकलं नाही आणि कोणाच्यानं संपणारही नाही. काँग्रेस पक्षाला गत वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रचंड कष्ट घेऊ! माझी शेवटची शोभा यात्रा काँग्रेस पक्षाच्या तिरंग्या झेंड्यातूनच निघेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

आहे तिथंच आहे आणि तिथंच राहणार! - यशोमती ठाकूर

'जे गेले ते का गेले याचे कारण स्पष्ट आहे. भाजपनं आता जी श्वेतपत्रिका काढली आहे, त्या श्वेतापत्रिकेच्या माध्यमातून काही लोकांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच परिणाम आपल्याला दिसतो आहे. भाजपमध्ये आता अन्य पक्षातीलच नेते अधिक झाले आहेत तरीही ते अजूनही असुरक्षित आहेत. ते केवळ सत्तेसाठी काहीही करण्याच्या मानसिकतेत आहेत. मात्र, काहीही असलं तरी आम्ही विचारधारेशी एकनिष्ठ आहोत. सर्वधर्मसमभावाच्या विचाराशी जोडले गेलेले आहोत. आम्ही कधीही विचारांशी प्रतारणा करणार नाही. आम्ही जिथं आहोत, तिथं आहोत आणि असणार आहोत, असं आमदार यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केलं आहे.

माझ्याबद्दल गैरसमज पसरवला जातोय! - विश्वजीत कदम

‘माझ्याबद्दल गैरसमज पसरवला जात आहे. मी आमदारकीचा अजिबात राजीनामा दिलेला नाही. काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय. पलूस-कडेगावच्या जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही,’ असं आमदार विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केलं आहे.

 

Whats_app_banner
विभाग