Ashok Chavan Reply to Rahul Gandhi : ‘सोनिया गांधी यांच्यासमोर मी रडलो हे राहुल गांधी यांचं वक्तव्य हास्यास्पद आहे. मी सोनियांना भेटलोच नव्हतो,’ अशा शब्दांत भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप रविवार, १७ मार्च रोजी मुंबईतील शिवाजी महाराज पार्कच्या मैदानात झाला. त्यावेळी राहुल गांधी यांनी खणखणीत भाषण केलं. देशातील विरोधी पक्षांना धमकावण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा कसा गैरवापर होत आहे याचे दाखले राहुल यांनी यावेळी दिले.
राहुल यांनी कोणाचंही नाव न घेता भाजपमध्ये गेलेल्या नेत्याचा किस्सा लोकांना सांगितला. 'महाराष्ट्रातील एक मोठा नेते भाजपमध्ये जाण्याआधी सोनिया गांधी यांना भेटला. तो त्यांच्यासमोर रडला. मला लाज वाटते. मी या शक्तीशी लढू शकत नाही. मला जेलमध्ये जायचं नाही, असं हा नेता म्हणाल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं. त्यांनी कोणाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख अशोक चव्हाण यांच्याकडंच होता हे स्पष्ट झालं आहे.
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर मीडियानं अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी या आरोपांवर उत्तर दिलं. ‘राहुल गांधी यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नाही. त्यामुळं ते कोणाबद्दल बोलत होते माहीत नाही. पण ते माझ्या संदर्भानं बोलले असतील तर त्यांचं वक्तव्य हास्यास्पद आहे. कारण, मी पक्षात असताना शेवटच्या दिवसापर्यंत पक्षाच्या मुख्यालयात काम करत होतो. मी पक्षांतर करणार हे कुणालाही माहीत नव्हतं. त्यामुळं मी सोनिया गांधी यांच्याकडं जाऊन काही भावना व्यक्त केल्या असं कुणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. मी सोनिया गांधी यांना अलीकडच्या काळात भेटलोही नाही,’ असं चव्हाण म्हणाले.
ईडी, सीबीआयचा वापर करून भाजपनं देशभरात खंडणी वसुली चालवली आहे. इलेक्टोरोल बाँड हा त्याचाच एक प्रकार आहे. कंत्राटं मिळाली की बाँडच्या माध्यमातून कंपन्या भाजपला हप्ते पोहोचवायच्या. मुंबईतील विमानतळ ईडी आणि सीबीआयच्या मदतीनंच रातोरात एका ठरावीक कंपनीला दिलं गेलं,' असा आरोपही त्यांनी केला.
संबंधित बातम्या