Ashok Chavan Joined BJP : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या पद्धतीनं काम करत आहेत ते कौतुकास्पद आहे. त्यांच्या कामानं प्रभावित झालो आहे. त्यांनी सुरू केलेल्या विकासात योगदान देण्याच्या भूमिकेतूनच मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे,’ असं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज स्पष्ट केलं.
अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर अपेक्षेनुसार त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चव्हाणांचं स्वागत केलं.
भाजप प्रवेशानंतर चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली. 'गेली ३८ वर्षे मी काँग्रेस पक्षात सक्रिय होतो. आता माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करतोय. नरेंद्र मोदी यांच्या कामातून एक स्फूर्ती आणि प्रेरणा मिळते. त्यांच्या अपेक्षेनुसार राज्यात, देशात विकासाचं काम करायचं आहे. विकासात योगदान द्यायचं आहे, याच भावनेतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
'मी नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवूनच काम केलंय. सत्तेत असो किंवा विरोधी पक्षात, विकासाच्या कामात मी नेहमीच सर्वांना सहकार्य केलं आहे. फडणवीसांचीही हीच भूमिका राहिली आहे. आम्ही विरोधी पक्षात असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या जिल्ह्याला न्याय देताना हात आखडता घेतला नाही, अशा शब्दांत चव्हाण यांनी फडणवीसांचंही कौतुक केलं.
‘मी आजवर ज्या पक्षात राहिलो तिथं प्रामाणिकपणे राहिलो, आताही त्याच पद्धतीनं काम करेन. महाराष्ट्रात आणि देशाच्या राजकारणात भाजप कसा मजबूत होईल यासाठी प्रयत्न करेन. मी कुठलीही मागणी केलेली नाही. पक्ष जे काम देईल, देवेंद्र फडणवीस जे सांगतील ते काम मी करेन,’ असं चव्हाण यावेळी म्हणाले.
नाना पटोले यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्याचं अशोक चव्हाण यांनी टाळलं. 'राजकारण हे सेवेचं माध्यम आहे. मी कोणावरही व्यक्तिगत टीका-टिप्पणी करणार नाही. पक्ष सोडण्याचा माझा निर्णय पूर्णपणे व्यक्तिगत आहे. मला कोणी जा म्हणून सांगितलं नाही. ज्या पक्षात होतो त्या पक्षाचं नुकसान करण्याचा माझा कुठलाही हेतू नाही. पक्ष सोडल्यावर कोणी टीका करणार, कोणी समर्थन करणार हे साहजिकच आहे. मात्र, मी कोणावरही टीका करणार नाही, असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या