मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूक बदल; दिवे घाट, बोपदेव घाट तीन दिवस बंद

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूक बदल; दिवे घाट, बोपदेव घाट तीन दिवस बंद

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 23, 2022 06:38 PM IST

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुण्यात मुक्कामी आहे. उद्या सकाळी हा सोहळा पंढरपुरसाठी मार्गस्थ होणार आहे. संत ज्ञानेश्वर महारांचा पालखी सोहळा दिवे घाट मार्गे जाणार आहे. या पार्श्वभूमिवर या घाटातील वाहतूक ही तीन दिवस बंद करण्यात आली आहे.

palkhi sohala
palkhi sohala

Ashadhi vari sohala 2022 पुण्यगरीत दोन्ही पालखी सोहळ्याचे जल्लोषात पुण्यात स्वागत करण्यात आले. गुरुवारी हा सोहळा पुण्यात मुक्कामी आहे. दरम्यान, हजारो भाविकांनी शिस्तीत रांगेत लागून दोन्ही पालख्यांचे दर्शन घेतले. दरम्यान हा सोहळा उद्या शुक्रवारी पंढरपुरसाठी मार्गस्थ होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ही दिवे घाटातून पुणे-सासवड-लोणंद मार्गे पंढरपूर अशी जाते. तर संत तुकाराम महाराज पालखी ही पुणे ते सोलापूर मार्गाने रोटी घाटमार्गे बारामती, इंदापूर, अकलूज मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होते. त्यामुळे वाहतूकीत बदल करण्यात आले आहे.

प्रशासनातर्फे दिवे घाट आणि बोपदेव घाट वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. २४ ते २८ जून या कालावधीत तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी २४ जून ते ५ जुलै या कालावधीत पालखी मार्गावरील पालखी मुक्कामाच्या गावांमध्ये ही वाहतूक बंद राहणार आहे.

माऊलींची पालखी ही २४ जुनला मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे २३ तारखेपासूनच रात्री ११ पासून २६ जून रात्री ८ पर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवे घाट व बोपदेव घाट मार्गे जाणारी वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. ही वाहतूक खडीमशीन चौक- कात्रज- कापूरव्होळमार्गे वळवण्यात आली आहे. तर सासवड बाजूकडून येणारी सर्व वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे पुण्याकडे वळवण्यात आली आहे.

या काळात माऊलींची पालखी ही सासवड ते जेजुरी, जेजुरी ते वाल्हे असा दोन दिवसांचा मुक्काम आटोपून निराकडे मार्गक्रमण करेल. त्यामुळे निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी झेंडेवाडी- पारगाव मेमाणे- सुपे- मोरगांव- नीरा या मागार्चा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा हा २५ जून रोजी पहाटे २ ते रात्री १० वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने वाघोली- केसनंद- राहू- पारगांव- चौफुला या मागार्चा वापर करतील. तसेच सोलापूर बाजूकडून पुण्याकडे येणारी वाहतूक चौफुला- पारगांव- राहू- केसनंद- वाघोली या मार्गाचा वापर करण्यास सांगितला आहे.

२६ जुनला पालखी ही वरवंड येथे मुक्कामी राहणार आहे. २६तारखेला या मर्गावरील वाहतूक रात्री २ ते रात्री १० वाजेपर्यंत पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहने थेऊर फाटा- केसनंद- राहू- पारगांव- न्हावरे- काष्टी- दौंड- कुरकुंभ या मार्गे वळवण्यात आली आहे. तर सोलापूर बाजूकडून येणारी वाहने कुरकुंभ- दौंड- काष्टी- न्हावरे- पारगांव- राहू- केसनंद- वाघोली या मार्गाने वळवण्यात आली आहे.

२७ जून रोजी पहाट २ ते रात्री १० वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने चौफुला- पारगांव- न्हावरे- काष्टी- दौंड- कुरकुंभ या मार्गाचा वापर करतील. तसेच सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे येणारी वाहतूक कुरकुंभ- दौंड- काष्टी- न्हावरे- पारगांव- चौफुला- वाघोली- पुणे या मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे.

बारामती ते पाटस आणि बारामती ते दौंड हे रस्ते बंद राहतील. सदर रस्त्यांवरील वाहतूक भिगवन मार्गे बारामतीला जाईल. बारामतीकडून येताना भिगवण मार्गे सोलापूर- पुणे महामार्गावर येईल. बारामती पाटस जाणारी वाहने ही बारामती- लोणीपाटी- सुपा- चौफुला- पाटस या मागार्ने जातील. तसेच पाटस- बारामती जाणारी वाहने पाटस- चौफुला- सुपा- लोणीपाटी- बारामती या मागार्ने जातील.

उंडवडी ते बारामती (बारामती मुक्काम) - २८ जून रोजी पहाटे २  ते रात्री ९.३०  वाजेपर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड हे रस्ते बंद राहतील. ही वाहतूक भिगवन मार्गे बारामतीला जाईल. बारामतीकडून येताना भिगवन मार्गे सोलापूर-पुणे महामार्गावर येईल.

बारामती ते सणसर ( सणसर मुक्काम)- २९  जून रोजी पहाटे २  ते रात्री १०  वोजपर्यंत जंक्शन ते बारामती हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल. वालचंदनगर व इंदापूरकडून येणारी वाहतुक जंक्शन येथून कळसमार्गे बारामती- आष्टी वळविण्यात येईल. बारामतीकडून येणारी वाहतूक भिगवण- कळसमार्गे जंक्शनकडे जाईल.

IPL_Entry_Point