मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ashadhi Wari : चांदोबाचा लिंब येथे रंगला माऊंलींचा अश्वरिंगण सोहळा; नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी जमले लाखो भक्तजन

Ashadhi Wari : चांदोबाचा लिंब येथे रंगला माऊंलींचा अश्वरिंगण सोहळा; नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी जमले लाखो भक्तजन

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 30, 2022 10:54 PM IST

उभ्या रिंगणासाठी साडेतीन वाजता माऊलीचा व स्वाराचा अश्‍व चांदोबाचा लिंब येथे दाखल झाले. सायंकाळी ४ वाजता माऊलींचा रथ रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचला.

चांदोबाचा लिंब येथे रंगला माऊंलींचा अश्वरिंगण सोहळा
चांदोबाचा लिंब येथे रंगला माऊंलींचा अश्वरिंगण सोहळा

 Ashadhi wari Sohala 2022 वारीच्या वाटचालीत नवचैतन्य निर्माण करणारा पहिल्या उभ्या रिंगणाचा सोहळा गुरुवारी मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात चांदोबाचा लिंब येथे पार पडला. सायंकाळी हा सोहळा तरडगांव मुक्कामी विसावला. उद्या हा सोहळा दोन दिवसाच्या फलटण मुक्कामासाठी मार्गस्थ होइल.

लोणंद येथील अडीच दिवसांच्या विश्रांतीनंतर माऊलींच्या पालखी सोहळ्याची तरडगांव मुक्कामी जाण्याची तयारी सुरू झाली. परंपरेप्रमाणे पहाटे संस्थानचे प्रमुख विश्वस्थ योगेश देसाई यांच्या हस्ते माऊलींची महापूजा व आरती करण्यात आली. कोकण, आंध्र, कर्नाटकासह सांगली, सातारा, कोल्हापूर आदि जिल्ह्यांतून आलेल्या लाखो भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले व ते सोहळ्यात सहभागी झाले.

उभ्या रिंगणासाठी साडेतीन वाजता माऊलीचा व स्वाराचा अश्‍व चांदोबाचा लिंब येथे दाखल झाले. सायंकाळी ४ वाजता माऊलींचा रथ रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचला. श्री स्वामी समर्थ आर्टच्या रांगोळी कलाकार राजश्री जुन्नरकर यांनी सुंदर अशा रांगोळ्याच्या पायघड्या घातल्या होत्या. पहिलाच रिंगण सोहळा असल्याने लाखो भाविकांनी गर्दी केली होती. चोपदार उध्दव यांनी रिंगण लावून घेतले. सायंकाळी सव्वा चार वाजता रिंगणासाठी अश्‍व सोडण्यात आले आणि दोन्ही अश्‍वांनी रथासमोरील २७ तर रथामागील २ दिंड्यांपर्यंत नेत्रदिपक दौड करून लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडले. सुरूवातीला स्वाराचा मोती हा अश्व पुढे धावला तर त्यामागे माऊलींचा हिरा हा अश्व धावला. दोन्ही अश्वानी धावत धावत रथाला प्रदक्षिणा मारली. रथाजवळ येवून अश्‍वांनी माऊलींचे दर्शन घेतले. सोहळा प्रमुख ॲड विकास ढगे पाटील यांनी अश्‍वाला प्रसाद दिला. त्यानंतर माऊलीचा अश्‍व पुढे तर स्वाराचा अश्‍व त्याच्या मागे धावत सोहळ्याच्या अग्रभागी जावून पोहोचले. बाळासाहेब चोपदार हे रथाजवळ उभे राहिले. त्यांनी चोप उंचावल्यानंतर तुकाराम तुकाराम नामाचा जयघोष झाला व रिंगण सोहळा पूर्ण केला. या रिंगण सोहळ्यानंतर दिंड्यादिड्यांमध्ये विविध खेळ खेळण्यात आले.

पालखी सोहळ्यातील हा पहिला उभ्या रिंगणाचा सोहळा पाहण्यासाठी लाखो वैष्णवांसह लोणंद, कापडगाव, चव्हाणवाडी, आरडगांव, पर्‍हार (खुर्द), हिंगणगांव, राहुडी, माळेवाडी, शिंदेमळा आदि गांवातील हजारो भाविक उपस्थित झाले होते. लोणंद ते तरडगांव या वाटचालीत ग्रामपंचायतीचे सरपंच, पदाधिकारी व भाविकांनी माऊलींसह सोहळ्याचे स्वागत करून दर्शन घेतले. तरडगांव येथे नव्याने तयार केलेल्या विस्तीर्ण अशा पालखी तळावर सायंकाळी ६ वा. हा सोहळा पोहोचला. समाज आरतीनंतर सोहळा विसावला. येथे सोहळ्याचा एक दिवस मुक्काम असून उद्या (शुक्रवार) हा सोहळा दोन दिवसांच्या फलटण मुक्कामाकडे मार्गस्थ होईल.

IPL_Entry_Point