बहुचर्चित आर्यन खान ड्रग्स प्रकरणात २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाप्रकरणी सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. सीबीआयने समीर वानखेडे व या प्रकरणातील अन्य एनसीबी अधिकाऱ्यांचे मोबाईल फोन जप्त केले आहेत. या सर्वांच्या मोबाईलमधील डाटा तपासला जाईल. समीर वानखेडे यांच्यासह विश्वविजय सिंग, आशिष रंजन या अधिकाऱ्यांचे फोन सीबीआयने जप्त केले आहेत.
२५ कोटी रुपयांची खंडणी अभिनेता शाहरुख खान याच्याकडे मागितल्याप्रमाणे सीबीआयचे पथक १८ मे रोजी समीर वानखेडेंची चौकशी करणार आहे. चौकशी करण्यापूर्वी सीबीआयने सर्वांचे मोबाईल जप्त केले आहेत. सीबीआयने काही दिवसांपूर्वी समीर वानखेडेंच्या मुंबईतील निवासस्थांनी छापेमारी केली होती. त्यावेळी सीबीआयच्या पथकाने त्यांची पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकरचा मोबाईलही जप्त केली होता.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात चर्चेत आलेले समीर वानखेडे यांच्याविरुद्ध सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करताना कॉर्डलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणाचा संपूर्ण वृत्तांत सादर करण्यात आला आहे. समीर वानखेडेंनी ड्रग्ज केसमधून सोडण्यासाठी शाहरूख खानकडे २५ कोटी रुपयांची मागणी केल्यासह अनेक धक्कादायक खुलासे सीबीआयच्या एफआयआरमध्ये करण्यात आले आहेत. आरोपी समीर वानखेडे आणि इतर जणांनी हा कट कसा रचला, याची संपूर्ण माहितीही सीबीआयने सादर केली आहे.
माजी नार्कोटिक्स अधिकारी समीर वानखेडे यांना सीबीआयने समन्स जारी केलं आहे. आपला जबाब नोंदवण्यासाठी त्यांना गुरुवारी, म्हणजेच १८ मे रोजी, नवी दिल्लीतील सीबीआय कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत
संबंधित बातम्या