धारावीमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ता अरविंद वैश्य यांच्या हत्येवरून तणावाची स्थिती आहे. त्यातच आज त्यांच्या अंत्ययात्रेवेळी दगडफेक केल्याने भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. परिस्थिती चिघळली असल्याने धारावीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण धारावीला पोलीस छावणीचं स्वरूप आलं आहे. गरीब नवाज नगर या भागात अरविंद वैश्य याच्या अंत्ययात्रेवेळी दगडफेक झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे
धारावीत अरविंद वैश्य या तरुणाची रविवारी हत्या झाली होती. सांप्रदायिक तणावातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे. रविवारी अरविंदच्या हत्येनंतर धारावी परीसरात मोठमोठी होर्डिंग लावण्यात आली असून त्यात “व्यर्थ न जायेगा बलिदान” असा मजकूर टाकण्यात आला आहे. यातूनच वादाची ठिणगी पेटली आहे. धारावी परिसरात हिंदु आणि अल्पसंख्याक समजाची मोठी वस्ती आहे. यामुळे धारावी मध्ये कालपासून तणावाच वातावरण निर्माण झालं.
अरविंद हा बजरंग दलाचा पदाधिकारी होताआणि गेल्या वर्षापासून हिंदुत्ववादी विचाराला प्रेरित होऊन काम करत होता.
धारावीच्या राजीव नगर भागात रविवारी रात्री दोन गटांमध्ये वाद सुरू होता. हा वाद सोडवायला गेल्यानंतर अरविंद वैश्यची हत्या करण्यात आली. अरविंदचा भाऊ शैलेंद्र याने दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी संध्याकाळी ७वाजण्याच्या सुमारास अल्लू,आरिफ,शुभम आणि शेर अली यांचं सिद्धेशसोबत भांडण सुरू होतं. हे भांडण सुरू असताना अल्लू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सिद्धेश आणि त्याच्या वडिलांना मारायला सुरूवात केली. हे भांडण सोडवायला अरविंद तिकडे गेला,तेव्हा अल्लू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अरविंदला मारहाण केली.
याची तक्रार द्याला अरविंद धारावी पोलीस ठाण्यात गेला होता. यावेळी त्याच्या मागे सद्दाम आणि जुम्मनही गेले. त्यांनी त्याला तक्रार मागे घेण्याची धमकी दिली.मात्र पोलिसांनी या धमकीकडे लक्ष न देता दोन पोलीस कर्मचाऱ्यांसोबत त्याला घटनास्थळी पाठवल्याचा भावाने आरोप केला आहे. अरविंद मित्रासोबत वसीम गॅरेजच्या पुढे गेला असता अल्लू, आरिफ, सद्दाम, जुम्मन, शेर अली आणि शुभम यांनी दोघांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यानंतर पोलीस शिपायांनी अल्लूला पकडलं, पण इतर आरोपी तिकडून पळून गेले. यानंतर आरिफलाही पकडण्यात आलं. अरविंद वैश्यला गंभीर जखमी अवस्थेत सायनच्या रुग्णालयात नेण्यात आलं, जिकडे त्याचा मृत्यू झाला.
अरविंद वैश्यवर७जणांनी हल्ला केला, पण पोलिसांनी केवळ २ आरोपींविरोधात एफआयआर दाखल केल्याची तक्रार हिंदूत्वावादी संघटनांनी केली आहे. यामुळे नाराज झालेल्या बजरंग दलासह इतर हिंदुत्ववादी संघटनांनी सोमवारी पोलीस स्टेशनसमोर आंदोलन केलं.