Arvind Kejriwal : ही २०२४ च्या निवडणुकीची सेमीफायनल; उद्धव ठाकरेंना भेटल्यानंतर केजरीवाल असं का बोलले?-arvind kejriwal meets uddhav thackeray at matoshree seek support against centres ordinance on control of services ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Arvind Kejriwal : ही २०२४ च्या निवडणुकीची सेमीफायनल; उद्धव ठाकरेंना भेटल्यानंतर केजरीवाल असं का बोलले?

Arvind Kejriwal : ही २०२४ च्या निवडणुकीची सेमीफायनल; उद्धव ठाकरेंना भेटल्यानंतर केजरीवाल असं का बोलले?

May 24, 2023 05:12 PM IST

Arvind Kejriwal meets uddhav thackeray : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज मातोश्री निवासस्थानी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राजकीय चर्चा केली.

Arvind Kejriwal meets Uddhav Thackeray
Arvind Kejriwal meets Uddhav Thackeray

Arvind Kejriwal meets uddhav thackeray : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी मोदी सरकारवर जोरदार तोफ डागली. सुप्रीम कोर्टानं दिल्ली सरकारच्या बाजूनं दिलेल्या निकालानंतर केंद्रानं काढलेला अध्यादेश संसदेत संमत न झाल्यास २०२४ साली मोदी सरकार पुन्हा येणार नाही, असा दावा केजरीवाल यांनी यावेळी केला.

दिल्ली सरकारच्या प्रशासकीय अधिकाराच्या वादात सर्वोच्च न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांच्या बाजूनं निर्णय दिला. कायदा-सुव्यवस्था, पोलीस व भूखंड व्यवहार वगळता अन्य सर्व बाबींविषयी कायदे बनवण्याचा व राबवण्याचा अधिकार लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा आहे, असं न्यायालयानं नमूद केलं. सत्तेवर न येता सत्ता राबवण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्या केंद्र सरकारसाठी हा दणका होता. या निकालानंतर आठच दिवसात केंद्रानं वटहुकूम काढून हा निर्णय निष्प्रभ ठरवला आहे.

हा वटहुकूम लवकरच संसदेत मंजुरीसाठी येण्याची शक्यता आहे. तो मंजूर होऊ नये यासाठी केजरीवाल प्रयत्नशील आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. ठाकरे यांनी वटहुकुमाच्या विरोधात आम्हाला पाठिंबा दिल्याचं केजरीवाल यांनी यावेळी सांगितलं.

'केंद्र सरकारनं काढलेला वटहुकूम म्हणजे एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला दिलेलं आव्हान आहे. देशभर सरकार पाडली जातायत, विरोधकांना त्रस्त केलं जात आहेत. राज्यपालांच्या माध्यमातून राज्यातील सरकारचा छळ केला जात आहे. हे लोकशाही विरोधी आहे. ही लढाई केवळ दिल्लीची नाही, ही लोकशाहीसाठीची, संविधानाची, संघराज्याची लढाई आहे. ही एक प्रकारे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल आहे. दिल्ली सरकारच्या प्रशासकीय अधिकारासंदर्भात केंद्र सरकारनं काढलेला वटहुकूम राज्यसभेत नामंजूर झाल्यास २०२४ साली देशात मोदी सरकार पुन्हा येणार नाही, असा विश्वासही केजरीवाल यांनी व्यक्त केला.