राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणवरून राजकीय वातावरण तापलं असताना तसेच मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीसाठी अंतरावली सराटीत तिसऱ्यांदा उपोषण सुरू केले असतानाच मराठा आरक्षण आंदोलनाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. २०१३ मधील एका प्रकरणात हे अटक वॉरंट (Arrest warrant) जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे यांना अटक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२०१३ मध्ये मनोज जरांगे आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी एका नाट्य प्रयोगाचं आयोजन केलं होतं. मात्र त्या नाट्य प्रयोगाची ठरलेली रक्कम न दिल्याचा आरोप नाट्यनिर्मात्यानं केला होता. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याच्या प्रकरणात मनोज जरांगे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोपात गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने जरांगे पाटील यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात २०१३ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणात पुणे न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोन वेळा समन्सही बजावले होते. त्यानंतर ते एकदा कोर्टात हजर झाले होते. मात्र पुढच्या तारखांना ते गैरहजर राहिले. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी २० जुलैपासून पुन्हा उपोषण सुरू केलं आहे. सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी करत त्यांना उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा चौथा दिवस होता. त्यांनी प्रकृती खालावल्यामुळेजालन्यातील वैद्यकीय पथकाकडून त्यांची दोनदा तपासणी करण्यात आली.
त्यांची शुगर लेव्हल कमी झाली असून रक्तदाबही कमी झाला आहे. जालन्यातील जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटील यांनी सांगिततले की, जरांगे यांचा आधी रक्तदाब १७० ते १७४ दरम्यान असायचा आता तो ९६-९८ वर आला आहे. त्यांची रक्तशर्कराही कमी झाली आहे. त्यांनी उपचार घ्यावेत अशी मागणी विनंती आहे.