फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा निकाल २१ मे रोजी जाहीर झाला आहे. मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात येणार असून या परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना २७ मे पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.
उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (परीक्षेस प्रविष्ट न झालेले), श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे तसेच आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी) सोमवार २७ मे पासून शुक्रवार ७ जून २०२४ या कालावधीत नियमित शुल्कासह भरता येणार आहेत. तर विलंब शुल्कासह अर्ज ८ जून ते १२ जून २०२४ या कालावधीत भरता येतील.
उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाची तारीख ३१ मे ते १५ जून २०२४ अशी असून उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख मंगळवार १८ जून २०२४ अशी आहे.
पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फतच ती भरावीत. आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने सादर करावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे राज्य मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेचा निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दहावीचा निकाल २७ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. ही परीक्षा पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोकण आणि लातूर विभागांमार्फत घेण्यात आली होती. विभागीय मंडळाने पेपर तपासणी पूर्ण केली आहे.
दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना mahresult.nic या बोर्डाच्या संकेतस्थळावर त्यांचा निकाल पाहता येणार आहे. तसेच https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर एकत्रित निकाल पाहता येणार आहे. तर आणखी काही संकेतस्थळावर देखील निकाल जाहीर केला जाणार आहे. या सोबतच डिजीलॉकरद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.