Pune Zika Virus: पुण्यात झिका विषाणूचा वेगाने प्रसार होत असून आतापर्यंत शहरात झिका विषाणूने बाधित ६ जण आढळले आहेत. यात दोन गर्भवती महिलांचा समावेश आहे. पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाधित महिला ही पहिल्या झिका विषाणूबाधित महिलेच्या घरापासून अवघ्या १५० मीटर अंतरावर गणेश नगर, एरंडवणे येथील रहिवासी आहे. महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ती १२ आठवड्यांची गर्भवती आहे. बाधित दोन्ही महिलांची प्रकृती स्थिर आहे.
महानगर पालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी राजेश दिघे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही गंभीर बाब आहे. बाधित महिलेमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. तिची अॅनोमली स्कॅन बाकी आहे. तिच्या आरोग्यावर आणि गर्भाच्या वाढीवर लक्ष घेऊन आहोत. तसेच सहा महिन्यांची गरोदर असलेल्या २८ वर्षीय महिलेची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे डॉ. दिघे यांनी सांगितले.
दिलेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय गर्भवती महिलेचे नमुने २७ जून रोजी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे (एनआयव्ही) पाठवण्यात आले होते. एनआयव्हीने सादर केलेल्या अहवालात या महिलेला झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान केले. हा अहवाल महानगर पालिकेला सोमवारी मिळाला. सोमवारी एकूण पाच नमुन्यांचे अहवाल पालिकेला मिळाले असून त्यापैकी चार जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.
डेंग्यू आणि चिकनगुनियासारख्या संसर्गाचा प्रसार करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या संक्रमित एडीज डासांमुळे झिका विषाणूचा प्रसार होतो. झिकाची लागण झालेले बहुतेक लोक एकतर लक्षणे नसलेले असतात किंवा ताप, पुरळ, अंगदुखी आणि सांधेदुखीची अशी सौम्य लक्षणे या रुग्णांमध्ये आढळतात. गर्भवती महिलांमध्ये झिका विषाणूमुळे नवजात मुलांवर परिमाण होऊ शकतो. नवजात बालकांमध्ये डोळ्यांची समस्या, श्रवणशक्ती कमी होणे या सारख्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
एनआयव्हीकडे पाठविण्यात आलेल्या सर्व नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून सहा रुग्णांमध्ये झिका विषाणू आढळला आहे, अशी माहिती डॉ. दिघे यांनी दिली. गेल्या आठवड्यात आम्ही २० हून अधिक नमुने एनआयव्हीकडे पाठवले होते. मुंढवा आणि एरंडवणे परिसरातील गरोदर मातांचे नमुने घेण्याच्या सूचना आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
पुणे शहरात आतापर्यंत झिका विषाणूचे सहा रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एरंडवणे येथील ४६ वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या १५ वर्षीय मुलीचा समावेश आहे. मुंढवा येथील ४७ वर्षीय महिला आणि तिच्या २२ वर्षीय मुलगा देखील झीका विषाणू बाधित असल्याचे आढळून आले आहे. याव्यतिरिक्त, दोन गर्भवती महिला देखील या विषाणूने बाधित झाल्या आहेत. गर्भवती महिला झिका विषाणूच्या बळी ठरल्या तर गर्भामध्ये मायक्रोसेफली होऊ शकतं. ज्यामध्ये मेंदूच्या असामान्य विकासामुळे बाळाचं डोकं खूपच लहान होतं. पालिकेने घरोघरी सर्वेक्षण सुरू केले असून उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे.