Pune Porsche : पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. ससुनच्या डॉक्टरांनी सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने घेतल्याचे पुढे आले आहे. या पूर्वी डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीचे रक्त नमुने बदलून त्याच्या आईच्या रक्ताचे नमुने घेतल्याचे देखील वृत्त होते. मात्र, पोलिसांनी याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. दरम्यान, कारमध्ये असलेल्या आरोपीच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुनेही विशाल अगरवालने बदलले असल्याची माहिती पुढे आली आहे. हा संपूर्ण व्यवहार ५० लाख रुपयांना झाला असल्याची चर्चा आहे.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी गुरुवारी न्यायालयासमोर अनेक माहिती सादर केली. सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या ठिकाणी आरोपीचे नमुने गोळा करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. एसीपी सुनील तांबे यांनी ससून रुग्णालयाचे माजी फॉरेन्सिक प्रमुख डॉ. तावडे, डॉ. श्रीहरी हरनोळ आणि कर्मचारी अतुल घाटकांबळे या तिघांना काल न्यायालयासमोर हजर केले. या तिघांच्याही कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती, ती न्यायालयाने ५ जूनपर्यंत वाढवली आहे.
अहवालानुसार, तांबे यांनी न्यायालयाला सांगितले की, ज्या सिरिंजमधून अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते, ती डस्टबिनमध्ये टाकण्यात आली नव्हती. त्याऐवजी, ते बदलन्यासाठी इतर कुणाला तरी देण्यात आले होते. या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. फिर्यादीचे वकील नितीन कोंगे यांनी न्यायालयाला सांगितले की, रक्ताचे नमुने जाणूनबुजून ससून रुग्णालयात घेतले होते, ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नव्हते.
आरोपींकडून आतापर्यंत तीन लाख रुपये जप्त करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. त्यापैकी घाटकांबळे याच्याकडे ५० हजार रुपये तर हरनोळ याच्या घरी अडीच लाख रुपये सापडले. वृत्तपत्रानुसार, एसीपीने म्हटले आहे की, 'आरोपी आणि इतर लोकांमध्ये अनेक व्हॉट्सॲप आणि नियमित कॉल्सवरुन संभाषण देखील झाले आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर लोकांची ओळख पटवायची असून त्यांची कोठडीत चौकशी करणे आवश्यक आहे. भ्रष्ट कारवायांमध्ये सहभागी होऊन आरोपींनी कोणत्या मालमत्तेची जमवाजमव केली आहे, याचा देखील तपास करायचा आहे असे कोर्टात सांगण्यात आले.
बचाव पक्षाच्या वकिलांनीही आरोपींना आणखी पोलीस कोठडी देण्यास विरोध केला. बचाव पक्षाच्या वकिलांनी म्हटले की डॉ. तावडे घटनास्थळी हजर नव्हते. त्यांचे सहकारी डॉक्टर हरनोळ यांच्या सोबत झालेले फोनवरील संभाषण सामान्य आहे. कारण दोघेही एकत्र काम करतात. अल्पवयीन आरोपींच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुनेही इतर लोकांच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले आहेत. आरोपी आणि अल्पवयीन मुलाच्या वडिलांचा त्यांना सामना करायचा आहे, असेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.
संबंधित बातम्या