मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी आज भाजपचे वरिष्ठ नेतेवगृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. शहा-राज ठाकरे भेटीमुळे मनसेची महायुतीत एंट्री पक्की मानली जात आहे, तसेच मनसेला लोकसभेच्या २ जागा व विधानसभेला सन्मानजनक जागावाटप करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र मनसेच्या महायुतीतील प्रवेशाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. राज ठाकरेंच्या या बदलेल्या भूमिकेवरुन महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यांना महाराष्ट्र धर्माची आठवण करून दिली आहे. आता राज ठाकरेंचे बंधु आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरून निशाणा साधला आहे.
नांदेडमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी समर्थकांना फक्त जल्लोषात राहू नका, तर प्रयत्न करा असा कानमंत्रही दिला. उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या बोगस बियाण्यांचा सुळसुळाट झाला आहे. भाजपातच अस्सल बियाणं नाही, तर ते शेतकऱ्यांना काय देणार. यांचं सगळं बियाणं बोगस आहे. ते सर्व माणसं बाहेरुन घेत आहेत.आजही कोणालातरी घेतलंय. कारण, त्यांना माहितीय, महाराष्ट्रात मतं मिळवायची असतील तर मोदीचा करिष्मा चालत नाही. येथे आजही ते ठाकरे नावावरच मिळतात. म्हणून बाळासाहेबांचा फोटो चोरला, आज आणखी एक ठाकरे चोरायचा प्रयत्न करत आहेत. अशा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी भाजपावर केला आहे.
एकनाथ शिंदेंवर टीका करताना उद्धव म्हणाले की, तुमच्या बापाच्या नावाने मतं मागा, माझा बाप कशाला चोरता. बाळासाहेब ठाकरे हे नाव बाजूला करा आणि मग मतं मागा.
संबंधित बातम्या