मुंबईसह राज्यभरात नुकतीच वार्षिक पक्षी गणना आयोजित करण्यात आली होती. या गणनेत राज्यभरातील पक्षीनिरीक्षकांनी सहभाग घेऊन पक्ष्यांच्या विविध प्रजातींचा शोध घेऊन त्यांची नोंद केली. या पक्षी गणनेचे निष्कर्ष एकत्रित केले जात असून लवकरच त्याची माहिती जाहीर केली जाईल अशी माहिती निसर्गतज्ज्ञ आणि लेखक तसेच या पक्षी गणना मोहिमेचे आयोजक संजय मोंगा यांनी दिली.
मुंबईतील बालरोगतज्ज्ञ तसेच पक्षीनिरीक्षक डॉ. सलील चोक्सी यांच्या नेतृत्वाखाली पाच जणांच्या टीमने जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) भागात १५ किलोमीटरच्या परिसरात फेरी मारून लोखंडवाला कॉम्प्लेक्स, पवई आणि भांडुपमधील आयआयटी-बॉम्बे कॅम्पसमधील दलदलीच्या भागातील पक्ष्यांची नोंद केली. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) सक्रीय कार्यकर्ते असलेले डॉ. चोक्सी म्हणाले, ‘आम्ही पक्ष्यांच्या एकूण ८२ प्रजाती पाहिल्या असून ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. शहराच्या सीमा वाढत आहेत आणि प्रदूषणातही वाढ होतय. तरीसुद्धा शहरी भागात अजूनही मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची विविध प्रजाती पाहणे शक्य आहे. पक्षी निरीक्षणासाठी मुंबईबाहेर जाण्याची गरज नाही.’ असं चोक्सी म्हणाले.
पक्षीनिरीक्षकांच्या टीमला अपेक्षेप्रमाणे स्थलांतरित व स्थानिक पक्षी दिसले. लोखंडवाला संकुलात कोरल टिंबा (Wood Sandpiper), आयआयटी कॅम्पसमध्ये जांभळा सूर्यपक्षी (Loten's Sunbird), जंगली घुबड (Jungle Owlet), भांडुप पंपिंग स्टेशन परिसरात रोहित पक्षी (Flamingos), टी. एस. चाणक्य पाणथळ परिसरात भुऱ्या रंगाचा चिखल्या (Black-billed Plover), ठाणे जिल्ह्यातील कर्वे पाणथळ जागेत दिसलेला काळ्या डोक्याचा खंड्या पक्षी (Black-capped Kingfisher) आणि विवा पाणथळ जागेत दिसलेला भारतीय नीलपंख पक्षी (Indian roller) ही या पक्षीनिरीक्षण अभियानातील काही ठळक वैशिष्ट्ये होती.
मीरारोड येथील रॉयल कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समध्ये 'नेचर क्लब'च्या प्रमुख असलेल्या राधिका डिसोझा या २००८ पासून अशा पक्षी गणनेत भाग घेत आहेत. त्यांनी यावेळी ४० विद्यार्थ्यांना सोबत घेत पक्षी गणनेत सहभाग घेतला होता. त्यांना एकूण ७९ ते ८० प्रजाती दिसून आल्या. त्या पहाटे साडेपाच वाजेपासून पक्षीनिरीक्षणाचे काम सुरू करत असत. ‘मी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन विरार-वसईचा किल्ला, ठाण्याची खाडी आणि अखेरीस आयआयटी पवईतील विवा पाणथळ जागेत पक्षीनिरीक्षण केले. पक्षी निरीक्षणाचे काम करणाऱ्या अनेकांच्या सहवासात वेळ घालवल्यामुळे विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळते’ असं डिसोजा म्हणाल्या.
या पक्षी गणनेत सहभागी झालेले पक्षीप्रेमी त्यांना दिसलेल्या पक्ष्यांची ‘ई-बर्ड’ अॅपवर नोंद करतात. मात्र गेल्या काही वर्षांत आढळलेल्या पक्ष्यांच्या प्रजातींची संख्या आता कमी झाली असल्याचं डिसोझा सांगतात. पूर्वी वसई किल्ल्यावर स्वर्गीय नर्तक पक्षी (Paradise Flycatcher) आणि सुरुची समुद्र किनाऱ्यावर बीचवर हुदहुद (Hoopoe) हा पक्षी दिसायचा. पण आता यावेळी आम्हाला ते पक्षी दिसले नाहीत.
मुंबई आणि महाराष्ट्र करण्यात आलेल्या पक्षी गणनेत या सर्व टीमला २७४ पक्ष्यांच्या प्रजाती दिसून आल्या. २०२३ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ३०० पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती दिसून आल्या होत्या. यात मुंबई महानगर परिसरातच सुमारे २५० प्रजाती आढळून आल्या होत्या. २०२२ मध्ये २५०, २०२१ मध्ये १८९, २०२० मध्ये १९२ आणि २०१९ मध्ये २३४ पक्ष्यांच्या प्रजाती आढळून आल्या होत्या.
संबंधित बातम्या