Anna Hazare appeal to voters : काँग्रेस प्रणित यूपीए सरकार जाऊन देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार आल्यापासून कुठल्याही महत्त्वाच्या प्रश्नावर आंदोलन न करणारे समाजसेवक अण्णा हजारे गेल्या काही दिवसांपासून मीडियाशी बोलू लागले आहेत. विशेषत: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यापासून अण्णा कमालीचे सक्रिय झाले आहेत. आता त्यांनी देशातील मतदारांना आवाहन केलं आहे. केजरीवालांना मत देऊ नका, असं त्यांनी थेट म्हटलं आहे.
दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आज चौथ्या टप्प्याचं मतदान सुरू असताना त्यांनी मतदारांना आवाहन केलं आहे. 'आज लोकशाहीचा मोठा उत्सव असून त्यात सर्वांनी सहभागी होऊन चारित्र्यवान आणि प्रामाणिक व्यक्तीला मतदान करावं. देशाची चावी मतदारांच्या हाती आहे. ही चावी योग्य हातात गेली पाहिजे, ती चुकीच्या हाती पडता कामा नये, असं त्यांनी म्हटलं आहे.
प्रामाणिक उमेदवार निवडून देण्याचं आवाहन करताना अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. ‘स्वच्छ उमेदवारांना निवडून द्या. अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) ज्यांची चौकशी सुरू आहे, अशांना निवडून देऊ नका,’ असं ते म्हणाले. 'दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांचं नाव आल्याबद्दल मी त्यांचा निषेध करतो. दारूच्या नशेत असल्यानंच त्यांनी हा भ्रष्टाचार केला. असे लोक पुन्हा निवडून येऊ नयेत, असं अण्णा हजारे म्हणाले.
यूपीए सरकारच्या काळात अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या बॅनरखाली आंदोलन झालं. या काळात अण्णा हजारे यांनी उपोषण केलं होतं. अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण, कुमार विश्वास यांच्यासह अनेक लोक त्यांच्यासोबत होते. अण्णा हजारे यांना हे आंदोलन अराजकीय ठेवायचं होतं, पण अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी राजकीय पक्ष काढण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांचे मार्ग वेगळे झाले. अण्णा हजारे यांनी यापूर्वीच दारू घोटाळ्यावरून अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
भाजपच्या विरोधातील राजकीय पक्ष अण्णा हजारे यांच्यावर नेहमीच संशय व्यक्त करत आले आहेत. अण्णा हजारे हे ठराविक पक्ष सत्तेवर असल्यावरच आंदोलनं करतात असा आरोप विरोधकांचा आहे. अण्णा हजारे यांनी देशाचं वाटोळं केलं, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी अलीकडंच केला होता. जनलोकपाल, माहिती अधिकार हे कायदे अण्णा हजारे यांच्यामुळंच झाले हे चुकीचं आहे. त्यासाठी अनेकांनी अनेक वर्षे लढा दिला होता. अण्णा हजारे हे स्वत:ची प्रतिमा उंचावण्यासाठी स्वत:ला दुसरे गांधी वगैरे म्हणून घेतात, असंही आव्हाड म्हणाले होते. आता केजरीवाल यांना मत देऊ नका असं आवाहन केल्यामुळं अण्णा हजारे हे विरोधकांच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या