बीडमधील झाडून सगळे अधिकारी वंजारी; इतर समाजाला न्याय कसा मिळणार? अंजली दमानिया यांचा सवाल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बीडमधील झाडून सगळे अधिकारी वंजारी; इतर समाजाला न्याय कसा मिळणार? अंजली दमानिया यांचा सवाल

बीडमधील झाडून सगळे अधिकारी वंजारी; इतर समाजाला न्याय कसा मिळणार? अंजली दमानिया यांचा सवाल

Jan 02, 2025 04:05 PM IST

Anjali Damania On Beed Crime : बीड जिल्ह्यातील सामाजिक परिस्थिती भयानक असून तिथं सगळे अधिकारी वंजारी समाजाचे आहेत. तिथं इतर लोकांना न्याय कसा मिळणार, असा सवाल त्यांनी केला आहे.

बीडमधील झाडून सगळे अधिकारी वंजारी; इतर समाजाला न्याय कसा मिळणार? अंजली दमानिया यांचा सवाल
बीडमधील झाडून सगळे अधिकारी वंजारी; इतर समाजाला न्याय कसा मिळणार? अंजली दमानिया यांचा सवाल

Beed Crime News in Marathi : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हा जिल्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. दिवसेंदिवस इथल्या गुन्हेगारीची हादरवून टाकणारी माहिती समोर येत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर आता आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. बीड जिल्ह्यात वंजारी समाजाचं वर्चस्व जाणीवपूर्वक निर्माण केलं गेल्याचा दावा त्यांनी केला आहे.

संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून आरोपींवर कारवाई व्हावी यासाठी दमानिया पाठपुरावा करत आहेत. रोजच्या रोज सोशल मीडियातून बीडच्या गुन्हेगारीची माहिती देत आहेत. लोकांना भेटत आहेत. वाल्मिक कराडच नव्हे तर धनंजय मुंडे यांच्यावरही त्या थेट निशाणा साधत आहेत. आता त्यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना तिथल्या जातीय वर्चस्वाची वस्तुस्थिती मांडली आहे.

'बीडमधील परिस्थिती अत्यंत भयानक आहे. मी तिथल्या ऑफिसर्सचे डिटेल्स घेतले. यादी बघितली. झाडून सगळेच्या सगळे वंजारी असल्याचं आढळून आलं. त्याचा मी अभ्यास केला तेव्हा कळलं की गोपीनाथ मुंडे सत्तास्थानी आल्यापासून वंजारी समाजातील लोकांची राज्यभर पोलिसात भरती केली गेली. शासनात भरती केली गेली. मग हळूहळू त्यांना बीडला आणण्यात आलं आणि आताच्या घटकेला त्या जिल्ह्यात वंजारी समाजाच्या पुढाऱ्यांवर कारवाई करण्याची कोणाची हिंमतच नाही अशी परिस्थिती आहे. सगळे पोलीस अधिकारी स्थानिक पुढाऱ्यांच्या मर्जीतले आहेत, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

नुसते मर्जीतलेच नाही, समाजाचेही!

'महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांत अधिकारी हे राजकारण्यांच्या मर्जीतले असतात. कलेक्टर, तहसीलदार हे सगळे मर्जीतले असतात. पण बीडमध्ये अधिकारी नुसते मर्जीतलेच नाहीत तर समाजाचे सुद्धा आहेत. इतर समाजाच्या लोकांसोबत हे काय न्याय करणार? आताची जी परिस्थिती आहे, ती इतकी गंभीर आहे की इतर समाजातील लोकांनी न्याय मागण्याचा प्रयत्नही केला तरी त्याला न्याय मिळणं शक्यच नाही. समाजही तोच आहे. शिवाय त्यांना पैसे दिले जातात, मग आपल्याच लोकांवर कोण कारवाई करणार, असा प्रश्न दमानिया यांनी केला.

लोक जिवाला घाबरतात!

निवडणुकीच्या काळातील दडपशाहीवरही त्यांनी भाष्य केलं. त्या म्हणाल्या, मी शेकडो लोकांकडून माहिती घेतली. त्यांच्या म्हणण्यानुसार निवडणुकीच्या वेळी आमच्या बोटाला शाई लावण्यात आली, पण मतदान करू दिलं नाही. आम्हाला तिथून हाकलून देण्यात आलं. हे सगळं सांगताना प्रत्येक माणूस आम्हाला सांगत होता की आमचं नाव कुठं येऊ देऊ नका, कारण आमच्या जिवाला धोका होईल.'

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर