Anjali Damania News: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण राज्यभरात तर गाजलच पण हिवाळी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही बीडमधील वाढती गुंडागर्दी आणि दहशतीवरुन आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
बीडमध्ये गेल्या काही दिवसांत खंडणी, जमिनी बळकावणे आणि बंदुकी दाखवून दहशत पसरवणे, अशा अनेक घटना घडल्या आहेत, यात राजकीय अनेक नेत्यांचा सहभाग असल्याचेही बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी महायुतीतील मंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, संदीप क्षीरसागर, सुरेश धस, पंकजा मुंडे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले. तसेच यापैकी कोणीही बीडमधील जमिनी बळकावल्या असतील, खंडणी मागितली असेल किंवा बंदूक दाखवून दहशत पसरवत असतील तर, ९२३५३५३५०० या क्रमांकावर फोन करण्याची विनंती केली. तसेच सगळी माहिती आणि माहिती देणाऱ्याचे नावे पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
नुकताच अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. एका ट्विटमध्ये त्यांनी धनंजय मुंडे यांचा हातात पिस्तूल असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, हे असले बॉस? इन्स्टाग्रामवर अशी रील दाखवल्यावर नवी पिढी ह्यातून काय प्रेरणा घेणार? कष्ट न करता पिस्तुल दाखवून पैसे कमावणे सोपे असेच त्यांना वाटते, आपला देश असा असणार आहे का? हे देशाबद्दल व्हिजन असणार आहे का ? ताबडतोब बीड मधील सगळ्या शास्त्र परवान्यांवर चौकशी लावा, गरज नसलेले सगळे परवाने रद्द करा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली.
दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी वाल्मिक कराड यांचा पोलिसांसोबत व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत वाल्मिक कराड पोलिसांशी काहीतरी बोलताना दिसत आहे. यावर अंजली दमानिया यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 'हे पोलिस आहेत का ह्या वाल्मिक कराडांचे नोकर? एसपी नवनीत कवत यांनी ताबडतोब आदेश द्यावे की कोणत्याही पोलिस ऑफिसरने या पुढे जिहुजुरी करता कामा नये', असे त्यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
अंजली दमानिया यांनी आणखी एक ट्वीट करून गृहमंत्री देवेंद्र फडणीसांना महाराष्ट्रातल्या सगळ्या शास्त्र परवान्यांची ताबडतोब चौकशी लावा, असे आवाहन केले. तसेच हातात बंदूक असलेल्या काही जणांचे फोटो शेअर केले आहेत. तसेच राज्यात जिथे गरज नाही असे सगळे शास्त्र परवाने रद्द करा, अशी विनंती केली. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे गुंडांचा नाही, अशा टोलाही त्यांनी लगावला.
बीड जिल्ह्यात गेल्या दिवसांत गुन्हेगारीच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यावर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत ३६ जणांची हत्या झाली आहे. तसेच गर्दी करून मारामारी करणे, दंगल घडवणे यासारखे ४९८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. एवढेच नव्हेतर बीडमध्ये महिला देखील सुरक्षित नाहीत. जिल्ह्यात गेल्या १० महिन्यात विनयभंगाच्या १५६ आणि छेडछाडीच्या ३८६ घटना घडल्या आहेत.
संबंधित बातम्या