Anjali Damania on Dhananjay munde resignation : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्याविरोधातील पुरावे त्यांना दिले होते. त्याचबरोबर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यातील आर्थिक संबंधाबाबतची माहितीही अजित पवारांना दिली होती. त्यानंतर या भेटीबाबत अंजली दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आता आपण केवळ ४ दिवस थांबणार आहोत. त्यानंतर मोठे आंदोलन सुरु करणार असल्याचे तसेच न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा दिला आहे.
अजित पवारांना कागदपत्रे दिल्यानंतर अंजली दमानिया यांनी माध्यमांना सांगितले की, अजित पवार धनंजय मुंडे यांच्या पक्षाचे जे अध्यक्ष असल्याने त्यांना भेटले. कारण त्या पक्षाकडून एकदा नाही तर दोनदा असं सांगण्यात आलं की जोपर्यंत पुरावे मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही राजीनामा घेणार नाही. म्हणून मी पुरावे घेऊन अजित पवारांना भेटायला गेले होते, असे दमानिया म्हणाल्या.
अजित पवारांना या सर्व कागदपत्रांच्या सत्यतेची पडताळणी करायची असल्याने त्यांना थोडा वेळ हवा आहे. मी ९६ तास म्हणजेच पुढचे चार दिवस थांबणार आहे. कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी तीन दिवस पुरेसे होतात. ४ दिवसानंतर मी आंदोलन सुरु करणार आहे. यावेळी दमानिया यांनी महाराष्ट्रातील जनतेला आव्हान केले की, तुम्ही पत्र एक पोस्टकार्ड घ्या आणि अजित पवार यांना पाठवा, कोणत्याही परिस्थितीत धनंजय मुंडे यांचा राजीनामा आता घ्यायला हवा.
२००७ मध्ये फ्लाय एश म्हणजे राख मोफत दिली जात होती, हे धनंजय मुंडे सांगत आहेत, मात्र त्यांचा दावा खोटा आहे. याचा खुलासाही मी येत्या चार दिवसात करणार आहे. असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
दमानिया यांनी सांगितले की, केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. मी सुद्धा न्यायालयात जाणार आहे. न्यायालयात दाखल केल्या जाणाऱ्या याचिकेमध्ये मी अनेक डिटेल्स टाकणार आहे. जर ४ दिवसात मी दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजित पवार यांनी घेतला नाही तर केतन तिरोडकर यांच्या याचिकेत मी इंटरप्रेन्शन करून माझ्याकडील सर्व कागदपत्रे मी कोर्टात देणार आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
संबंधित बातम्या