मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Anil Parab Sai Resort : ट्विन टॉवरप्रमाणे वादग्रस्त अनिल परबांचे साई रिसॉर्ट होणार जमीनदोस्त !

Anil Parab Sai Resort : ट्विन टॉवरप्रमाणे वादग्रस्त अनिल परबांचे साई रिसॉर्ट होणार जमीनदोस्त !

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 29, 2022 08:43 PM IST

शिवसेना नेते व माजी परिवहन मंत्री अनिल परब(Anil Parab)यांना धक्का देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परब यांचे दापोलीतील साई रिसॉर्ट (sai resort) पाडण्याचे आदेश दिले आहेत.

साई रिसॉर्ट होणार जमीनदोस्त!
साई रिसॉर्ट होणार जमीनदोस्त!

रत्नागिरी - शिवसेना नेते व माजी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना धक्का देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परब यांचे दापोलीतील साई रिसॉर्ट (sai resort) पाडण्याचे आदेश दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील अनिल परब यांचे वादग्रस्त साई रिसॉर्ट (Sai Resort) पाडण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले आहेत. याबाबत मुरुडमधील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे आणि शासकीय पद्धतीने पाडण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच हे रिसॉर्ट पाडण्यात येईल, अशी माहिती  जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी बैठकीनंतर दिली आहे.

बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि शिवसेनेमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. एकनाथ शिंदे यांनी अनिल परब यांचे वादग्रस्त रिसॉर्ट पाडण्याचे आदेश देऊन शिवसेनेला आणखी एक धक्का दिला आहे. शिंदे यांनी अनिल परब यांच्या दापोली येथील अनधिकृत रिसॉर्टवर कारवाई करावी, या फाईलवर सही केली आहे. यावर आज मुरुडमधील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कोस्टल झोन मॉनिटरिंगची कमिटीची जिल्हाधिकाऱ्यांसोबतची बैठक पार पडली. त्यानंतर केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे आणि शासकीय पद्धतीने पाडण्यासंदर्भात प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ बी. एन. पाटील यांनी दिली आहे. सी कॉन आणि साई रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात आराखडा तयार करण्यात आला आहे. रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात बांधकाम विभागाला नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

अनिल परब यांचे दापोली-मुरुड समुद्र किनाऱ्यावर असलेले साई रिसॉर्ट हे नियमांचे उल्लंघन करुन बांधल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. याविरोधात सोमय्या यांनी अनेक वेळा आंदोलनेही केली आहेत. हे रिसॉर्ट वादग्रस्त असल्याचे पुरावे सोमय्यांनी सरकारला दिल्यानंतर आता रिसॉर्ट पाडण्याचा आदेश महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आले आहेत. याची माहिती सोमय्यांनी ट्विट करून दिली होती.

WhatsApp channel