मुंबई : १०० कोटींची लाच घेतल्या प्रकरणी तुरुंगात असलेले माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या छातीत दुखत असल्याने ते तुरुंगात चक्कर येऊन पडल्याची माहिती मिळत आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या पूर्वीही त्यांना असाच त्रास झाला होता. तेव्हा त्यांच्यावर उपचार करून पुन्हा तुरुंगात नेण्यात आले होते. आज घडलेल्या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासन हादरून गेले आहे. देशमुख यांचा बीपी वाढला आहे व ई.सी.जी. नॉर्मल आला नसल्याची माहिती मिळत आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. सीबीआयने देशमुख तसेच त्याचे सहकारी असलेलेसंजीव पालांडे. कुंदन शिंदे यांच्यावर देखील गुन्हे दाखल केले आहेत. देशमुख यांना गेल्या वर्षी सीबीआयने अटक केली होती. त्यांना मुंबईतील आर्थर रोड येथील तुरुंगात ठेवण्यात आले आहे. देशमुख यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. ईडीनेही त्यांच्यावर दोषारोप पत्र सादर केले आहे. देशमुख यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. त्यामुळे ते वर्षभरपासून तुरुंगात आहेत. १०० कोटी रुपयांच्या लाचखोरीच्या आरोपांच्या चौकशीबाबत मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोपपत्र दाखल केले आहेत. मुंबईतील विशेष न्यायालयाने बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे यांनी सरकारी साक्षीदार होण्यासाठी याचिका दाखल केली होती. ती न्यायालयाने मान्य केली आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांचे वय हे ७० पेक्षा अधिक आहे. त्यांना ब्लड प्रेशर आणि मधुमेह यासारखे आजार आहे. तुरंगात असल्याने त्यांना अनेक त्रास होत आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती ही अधून मधून खराब होत असते. जेल प्रशासन त्यांच्या तब्येतीकडे लक्ष ठेऊन आहेत. सध्या त्यांच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या देशमुख यांची तब्येत कशी आहे या बाबत माहिती मिळू शकली नाही. जे जे रुग्णालयानेही या बाबत काही माहिती प्रसारित केलेली नाही.