Leopard attack alert - बिबट्याचा हल्ला रोखण्यासाठी ‘ॲनिडर’ यंत्र बनले लाखो गावकऱ्यांसाठी जीवन रक्षक!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Leopard attack alert - बिबट्याचा हल्ला रोखण्यासाठी ‘ॲनिडर’ यंत्र बनले लाखो गावकऱ्यांसाठी जीवन रक्षक!

Leopard attack alert - बिबट्याचा हल्ला रोखण्यासाठी ‘ॲनिडर’ यंत्र बनले लाखो गावकऱ्यांसाठी जीवन रक्षक!

Dec 09, 2024 03:46 PM IST

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बिबट्यांची प्रचंड संख्या वाढल्याने मानवी वस्त्यांमध्ये वावर वाढला आहे. बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी वन विभागाने काही गावांमध्ये सायरनचा आवाज करणारे ‘ॲनिडर’ यंत्र लावले आहे. जाणून घेऊ या यंत्राविषयी.

बिबट्याचा हल्ला रोखण्यासाठी ‘ॲनिडर’ यंत्र
बिबट्याचा हल्ला रोखण्यासाठी ‘ॲनिडर’ यंत्र

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील निरगुडसर गावातील चोळीचा मळा परिसरात १५ नोव्हेंबरच्या रात्री पावणेबाराच्या सुमारास एका वस्तीत बिबट्या शिरला होता. वस्तीतील एका घरापासून ३०-३५ मीटर अंतरावर बिबट्या येताच एक मोठा सायरनचा आवाज होऊ लागला. तसेच या यंत्रातून पिवळ्या रंगाचे प्रकाशकिरणे परावर्तित होऊ लागली. सायरनचा आवाज आणि प्रकाशामुळे बिबट्या घाबरला आणि त्याने त्या भागातून पळू काढला. वन्य प्राण्यांना इशारा देणाऱ्या ‘ॲनिडर’ या यंत्रामुळे वस्तीवर बिबट्याचा संभाव्य हल्ला टळला होता.

या भागातली ही एकमेव घटना नाही. पुणे जिल्ह्यात आंबेगाव आणि जुन्नर तालुके हे बिबट्यांच्या हल्लाबाबत हॉटस्पॉट ठरले आहे. या परिसरात शेत तसेच मानवी वस्तीजवळ वन्य प्राण्यांचा वावर शोधण्यासाठी डिझाइन करण्यात आलेले Anider (Animal Intrusion Detection and Repellent System) हे वन विभागाने नव्याने बसवलेले यंत्र अतिशय प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे. या यंत्रात सेन्सर लावलेले असते. हे सेन्सर ३०-३५ मीटर अंतरावर असलेल्या वन्य प्राण्याची हालचाली शोधते. वन्य प्राणी टप्प्यात आला की या यंत्रातून जोरात सायरनचा आवाज निघतो. तसेच हाय बीम लाइट प्रसारित होतात. यामुळे आवाज ऐकून आणि लाइट पाहून वन्यप्राणी घाबरून जंगलात पळून जातात. अशा या ‘ॲनिडर’ यंत्राची बाजरातील किंमत अंदाजे १८ हजार ते २० हजार रुपयांदरम्यान आहे. जुन्नर व आंबेगाव तालुक्यात बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी या यंत्रामुळे चांगले परिणाम दिसून येत असल्याचा दावा वनविभागाने केला आहे.

याबाबत बोलताना जुन्नर वनविभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस म्हणाल्या, ‘सध्या जुन्नर परिसरात २०, ओतूर परिसरात २०, शिरूर परिसरात १० आणि मंचर भागात ५ असे एकूण ५५ ‘ॲनिडर’ यंत्र बसवण्यात आले आहेत. ही यंत्रणा बिबट्याच्या उपस्थितीबद्दल लोकांना सावध तर करतेच शिवाय प्राण्याचे सुद्धा रक्षण करते. बिबट्याला हाकलताना त्याला इजा पोहोचवण्याची किंवा कशात अडकवण्याची आवश्यकता नाही. या यंत्रणेमुळे वन्यप्राणी स्वतःहून जंगलाच्या दिशेने निघून जातो.  

‘ॲनिडर’ ही हाताने चालवता येणारी प्रणाली असून ग्रामस्थ आणि वन्यप्राण्यांची सुरक्षा करण्यासाठी सौर कुंपण प्रकल्पासोबत जोडण्याचा वनविभागाचा प्रयत्न आहे.

बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी सौर कुंपणाचा होतोय वापर

बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी ‘ॲनिडर’ यंत्रणेसोबतच या भागातील गावकरी सौर कुंपणाचाही वापर करताना दिसत आहे. जुन्नर तालुक्यातील शिरोली खुर्द येथील शेतकरी सागर मोरे यांनी सांगितले की, बिबट्याने नुकतेच त्यांच्या पाळीव कुत्र्याला ठार मारले होते. त्यानंतर त्यांनी घराभोवती सौर कुंपण बसवले. अलीकडेच बिबट्या या कुंपणाच्या संपर्कात आला तेव्हा त्याला किरकोळ करंट लागला. करंटच्या झटक्यामुळे बिबट्या पळून गेला. त्यानंतर घराभोवती बिबट्याचा वावर दिसलेला नाही.

मोकळ्या जागेवर जनावरांसोबत जंगलात राहणारे मेंढपाळ, शेतमजुरांचे बिबट्याच्या संभाव्य हल्ल्यांपासून रक्षण व्हावे यासाठीही वन विभागाने सौर दिवा व तंबू वाटप योजना आणली आहे. विभागाने ४०० सौर दिवे आणि तंबू खरेदी केले आहेत. पहिल्या टप्प्यात जुन्नर तालुक्यातील मेंढपाळांना ८५ सौर दिवे व तंबूंचे वाटप करण्यात आले आहे. विशेष प्रकारे बनवण्यात आलेल्या तंबूंमुळे मेंढपाळांचे बिबट्याच्या हल्ल्यापासून संरक्षण तर होतेच शिवाय सर्पदंश आणि खराब हवामानापासूनही त्यांचे संरक्षण होत आहे, असे जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर