Andhra Pradesh Viral Video: आंध्र प्रदेशातील कडपा येथे बुधवारी सकाळी दोन विद्यार्थी सायकलवरून शाळेत जात असताना विद्युत तारेच्या संपर्कात आले. या घटनेत एका मुलाचा जागीच म़ृत्यू झाला. तर, दुसरा मुलाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इंटरनॅशनल वेल्फेअर मंडपमजवळील आगडी रस्त्यावर ही घटना घडली. या घटनेमुळे रहिवासी आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेसाठी त्यांनी वीज अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले. तसेच त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता दहावी आणि आठवीत शिकणारे विद्यार्थी सायकलवरून विद्यासागर शाळेकडे जात होते. मात्र, इंटरनॅशनल वेल्फेअर मंडपमजवळील आगडी रस्त्यावर ते हाय टेंशन विद्युत तारेच्या संपर्कात आले. या घटनेत एका मुलाचा गंभीर भाजल्याने मृत्यू झाला. तर, दुसऱ्याला जखमी अवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात दोन्ही मुले सायकलवरून जाताना दिसत आहे. मात्र, काही क्षणानंतर दोघेही खाली पडतात. यानंतर एका मुलाच्या शरिराला आग लागते. तर, दुसऱ्या मुलगा त्याच्या बाजुला निपचित पडलेला दिसत आहे.
वसईमध्ये काही दिवसांपूर्वी सोसायटीच्या बागेत खेळत असलेल्या जोसेफ थॉमस या आठ वर्षांच्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. एव्हरशाईन सिटीतील स्काय हाइट्स सोसायटीच्या बागेत थॉमस आपल्या मित्रांसोबत खेळत असताना विजेच्या खांबाला जोडलेल्या विद्युत तारेच्या संपर्कात आला. यानंतर सोसायटीतील एका रहिवाशाने थॉमसला बेशुद्धावस्थेत पाहिले आणि वॉचमन सोसायटीच्या इतर सदस्यांना याची माहिती दिली. तसेच थॉमसला तातडीने जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
इमारतीतील रहिवासी राहुल डोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कामावरून घरी जात असताना मला बागेत थॉमस बेशुद्ध अवस्थेत जमीनीवर पडलेला दिसला. थॉमसला अशा अवस्थेत पाहून मला समजले की, येथे काहीतरी गडबड आहे. मी लगेच याची माहिती सोसायटीच्या वॉचमनला दिली.' बागेच्या देखभालीची जबाबदारी कोणाची आहे, याचा शोध घेण्यासाठी सोसायटीच्या सदस्यांची चौकशी केली जात आहे, अशी माहिती आचोळे पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. जोसेफ दररोज बागेत खेळत असे. माझ्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार कोण, याचा तपास पोलिसांनी करावा आणि त्याला अटक करावी, जेणेकरून इतर मुले वाचतील, असे थॉमसच्या वडिलांनी पोलिसांना विनंती केली.