मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rutuja Latke: शिवसेनेला मोठा दिलासा; ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर करण्याचे कोर्टाचे BMC ला आदेश

Rutuja Latke: शिवसेनेला मोठा दिलासा; ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर करण्याचे कोर्टाचे BMC ला आदेश

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Oct 13, 2022 03:41 PM IST

Bombay High Court on Rutuja Latke Resignation: शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दिलेला महापालिका सेवेचा राजीनामा तात्काळ मंजूर करावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं प्रशासनाला दिला आहे.

Rutuja Latke
Rutuja Latke

Bombay High Court on Rutuja Latke Resignation: मुंबई उच्च न्यायालयानं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा दिलासा दिला आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश न्यायालयानं मुंबई महापालिकेला दिले आहेत. त्यामुळं ऋतुजा लटके ह्याच शिवसेनेच्या उमेदवार असतील हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे.

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी येत्या ३ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महापालिकेच्या कर्मचारी असलेल्या लटके यांनी निवडणूक लढविण्यासाठी नियमानुसार आपला राजीनामा सादर केला होता. मात्र, त्यात त्रुटी असल्याचं सांगत महापालिका प्रशासनानं हा राजीनामा स्वीकारलाच नव्हता. त्यामुळं लटके यांना निवडणूक लढता येणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. 

भारतीय जनता पक्ष व एकनाथ शिंदे गट महापालिकेवर दबाव आणत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला होता. हाच मुद्दा घेऊन लटके यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी झाली. सुमारे तासभर या प्रकरणावर सुनावणी झाली. लटके यांचा राजीनामा कधी स्वीकारायचा हा महापालिकेचा अधिकार आहे. त्यांची याचिका दखल घेण्यायोग्य नाही, असं महापालिकेचं म्हणणं होतं. मात्र, लटके यांनी नियमानुसार राजीनामा दिला आहे. तसंच, यापूर्वी नोटीस कालावधी शिथील करून राजीनामा मंजूर केल्याचा दाखलाही लटके यांच्या वकिलांनी न्यायालयात दिला. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं लटके यांच्या बाजूनं निकाल दिला.

पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १४ ऑक्टोबर आहे. अर्ज भरण्याची मुदत उद्या दुपारी तीन वाजता संपत आहे. त्यामुळं महापालिकेनं उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत लटके यांचा राजीनामा मंजूर करावा, असे आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत.

IPL_Entry_Point