Sanjay Raut : आनंद दिघे यांच्या जीवनावरील ‘धर्मवीर २’ सिनेमाच्या प्रीमियर सोहळ्यात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘धर्मवीर ३’ची पटकथा लिहिणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप, देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांचा जोरदार समाचार घेतला आहे. ‘आनंद दिघे हे बाळासाहेब ठाकरे यांच्याही वर होते असं दाखवण्याचा भाजप व शिंदेंचा खटाटोप सुरू आहे,’ असं संजय राऊत म्हणाले.
ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 'आनंद दिघे यांची व्याप्ती काय होती हे आम्हाला माहीत आहे. देवेंद्र फडणवीस यांना ते माहीत नाही. एकनाथ शिंदेंनाही माहीत नाही. आनंद दिघे कोण होते ते आम्हाला माहीत आहे. ते शिवसेनेचे ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते. भाजपच्या मदतीनं त्यांना आता बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षाही मोठं दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. बाळासाहेबांवर श्रद्धा असलेले महाराष्ट्रात जे लाखो लोक आहेत, ते एकनाथ शिंदे यांना मानत नाहीत. त्यामुळं एक नवीन प्रतीक निर्माण करायचं काम सुरू आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
'आनंद दिघे हे एक निष्ठावंत शिवसैनिक होते. पदाधिकारी होते. सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सतत पुढं जायचे. दुर्दैवानं त्यांचा अकाली मृत्यू झाला. शिंदेंपेक्षा राजन विचारे व शिवसेनेचे इतर लोक आनंद दिघे यांच्या जवळ होते. त्यामुळं काल्पनिक कथा रचून पडद्यावर सिनेमे आणण्यापेक्षा त्यांच्यासारखी पक्षाविषयी निष्ठा बाळगली असती तर असे सिनेमे काढून डंका पिटण्याची वेळ आली नसती, असा सणसणीत टोला राऊत यांनी हाणला.
'आनंद दिघे यांना आम्ही जास्त ओळखायचो. आताचे लोक काय आहेत ते आम्हाला माहीत आहेत. पहिल्या सिनेमात धर्मवीरांचा मृत्यू दाखवला आहे. आता २, ३ आणि ४ काढतायत. हे काय अमर अकबर अँथनी सिनेमा काढतायत का? खरं म्हणजे यांनी गोलमाल १, गोलमाल २, गोलमाल ३ सिनेमा काढला पाहिजे. फडणवीसांना धर्मवीर काय माहीत? त्यांनी औरंगजेबावर सिनेमा काढला पाहिजे. महाराष्ट्र लुटायला दिल्ली व गुजरातमधून जे औरंगजेब आणि अफझलखान येतायत, त्यांच्यावर फडणवीसांनी सिनेमा काढला पाहिजे. तर त्याची नक्कीच चर्चा होईल, असंही राऊत म्हणाले.
मी आधुनिक अभिमन्यू आहे. चक्रव्यूह तोडून दाखवेन असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. त्याचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला. 'चक्रव्यूहात योद्धे अडकतात. बेईमान अडकत नाहीत. फडणवीसांनी स्वत:ची तुलना अभिमन्यूशी करू नये. अभिमन्यू खरा योद्धा होता. प्रामाणिक होता. त्याला स्वत:चे विचार आणि भूमिका होती. फडणवीसांकडं असं काही दिसतं का? हातात पिस्तूल घेऊन पोस्टर लावले की कुणी अभिमन्यू होत नाही,' असा खोचक टोला संजय राऊत यांनी हाणला.