Thane news: ठाण्यात एका आयआयटी पदवीधर असलेल्या तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यानं एका इमारतीच्या ८ व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं आहे. घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करता न आल्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. ही घटना ठाण्यातील माजिवडा भागात रविवारी घडली.
दीप ठक्कर (वय २८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने एका इमारतीच्या आठव्या मजल्यावरून खाली उडी मारत आत्महत्या केली. आत्महत्यापूर्वी त्याने चिठ्ठी लिहिली असून त्याने आत्महत्या का केली याचे कारण सांगितले आहे.
दीप हा माजिवडा येथील वसंत लाॅन्स येथील एका सोसायटीत राहत होता. तो या इमारतीत ८ व्या मजल्यावर त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. दीपने बी.टेक. केले आहे. शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास त्याने घराच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वर्तकनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दीपचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी दवाखान्यात पाठवला. यानंतर त्याचा मृतदेह कुटुंबियाना देण्यात आला.
दरम्यान, दीपने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. ही चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. यात त्याने आत्महत्या का केली याचे कारण लिहिले आहे. दीपने चिठ्ठीत कुणाला जबाबदार धरू नये असे लिहिले आहे. त्याने त्याच्या आई वडिलांची व नातेवाईकांची माफी मागितली आहे. कुटुंबियांच्या आशा पूर्ण करता आल्या नाही या मुळे तो निराश होता. त्याला तो स्पर्धा परीक्षा करत होता. मात्र, त्याला त्यात यश आले नाही. यामुळे तो नैराश्यात होता. यातून त्याने ही पाऊल उचलले असे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणाची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला आहे, परंतु कोणताही गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारली आहे. घटनेनंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आणि कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर काही वेळातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी वर्तक नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.