Amrit Bharat Yojana : भारतीय रेल्वेने मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत मुंबई लोकलच्या २० स्थानकांचा कायापालट होणार आहे. यामध्ये मध्य रेल्वेवरील १२ तर पश्चिम रेल्वेवरील ८ स्थानकांचा समावेश आहे. भारतीय रेल्वेच्या वतीने अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत अपग्रेड आणि आधुनिकीकरणासाठी देशभरातील १३०९ स्थानकांचे काम केले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २६ फेब्रुवारी रोजी भारतातील एकूण ५५४ हून अधिक रेल्वेस्थानकामधील विविध विकासकामे तसेच १५०० रोड ओव्हर ब्रीज आणि भुयारी मार्गाचे उद्घाटन करणार होणार आहे.
केंद्र सरकारकडून ४८८६ कोटींहून अधिक खर्च करून देशभरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. यात मुंबईतील २० रेल्वेस्थानकांचा समावेश आहे.
या योजनेतून मध्य रेल्वे मार्गावरील १२ स्थानकांचा कायापालट करण्यात येणार आहे. यामध्ये सँडहर्स्ट रोड, भायखळा, चिंचपोकळी, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा, वडाळा रोड, इगतपुरी आदि स्थानकांचा समावेश आहे. यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागासाठी २६० कोटींचा निधी देण्यात आला आहे. या १२ स्थानकांमध्ये सर्वात जास्त निधी हा दिवा रेल्वे स्थानकासाठी ४५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निधीतून स्थानकाच्या पुनर्बांधणी आणि पुनर्विकासाचे काम केले जाणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील ८ स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. यामध्ये मरीन लाईन्स, चर्नी रोड, ग्रँड रोड, लोअर परळ, प्रभादेवी, जोगेश्वरी आणि मालाड स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकासाठी १२ मीटर रुंद पायी ओव्हर ब्रिजसाठी तरतूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील ११ स्थानकांपैकी मरीन लाइन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, लोअर परळ, प्रभादेवी जोगेश्वरी, मालाड आणि पालघर या ८ उपनगरीय स्थानकांची पायाभरणी करण्याकरिता २३३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
संबंधित बातम्या