मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अमरावती : उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास NIA कडे; केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश

अमरावती : उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास NIA कडे; केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jul 02, 2022 04:02 PM IST

अमरावतीमधील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपासNIA कडे
उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपासNIA कडे

अमरावती - अमरावतीमधील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA)सोपवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. गृहमंत्रालयाकडून तसे आदेश देण्यात आले आहेत.

अमरावती येथील केमिस्ट उमेश कोल्हे (Umesh Kolhe)यांनी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्यांना धमक्या येऊ लागल्या होत्या. २१ जून रोजी कोल्हे यांची हत्या झाली होती.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एनआयएला या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. अमरावतीतील कोल्हे हत्या प्रकरणाचा संबंध उदयपूरमधील कन्हैयालालच्या हत्येशी संबंध तर नाही ना, याचा तपास एनआयए करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, अमरावतीतील केमिस्ट कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक न्यायालयाने आरोपींना ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आतापर्यंत ६ जणांना अटक -

अमरावती शहरातील केमिस्ट उमेश कोल्हे यांची २१ जूनला रात्री हत्या झाली होती. कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याने त्यांची हत्या झाल्याचा आरोप होत होता. याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली होती.

दरम्यान याच प्रकरणाच्या चौकशीसाठी एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) पथक आणि एटीएस पथक अमरावती शहरात पोहोचले आहेत. त्यांच्याकडून या प्रकरणाशी संबंधितांची स्थानिक पोलिसांकडून माहिती घेत आहेत. याआधी या प्रकरणात पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आता पोलिसांनी सहाव्या आरोपीलाही अटक केल्याची माहिती मिळत आहे.

IPL_Entry_Point

विभाग