Amravati Accident: कॉलेजला निघालेल्या तरुणीला टिप्परनं चिरडलं, अमरावती येथील धक्कादायक घटना
Accident: अमरावती येथील हनवतखेडा मार्गावर दुचाकी आणि टिप्परच्या अपघातात २३ वर्षीय विद्यार्थीनीला जीव गमवावा लागला.
Amravati Accident: अमरावती येथील हनवतखेडा मार्गावर दुचाकी आणि टिप्परचा अपघात झाला. या अपघातात २३ विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी (१७ मार्च २०२३) सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी टिप्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक्षा गावंडे असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यीनीचे नाव आहे. प्रतीक्षा ही परतवाडा येथील भगवंतराव शिवाजी पाटील कॉलेजमध्ये एम.कॉम.ला शिकत होती. ती नेहमीप्रमाणे दुचाकीने कॉलेजला जात असताना टिप्परने तिला धडक दिली. या धडकेत प्रतिक्षा टिप्परच्या मागच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर टीप्पर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या अपघाताची माहिती मिळताच रतवाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेहाला शवविच्छेदनासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी टिप्परचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
प्रतीक्षा ही एका प्रतिष्ठित शेतकरी कुटुंबातील असून तीन भावंडांमध्ये सर्वात लहान होती. तिच्यापेक्षा मोठ्या बहीण आणि भावाचे लग्न झाले होते. प्रतीक्षाला एम. कॉम. पूर्ण करायचे होते. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तिची अधिकारी होण्याची इच्छा होती, ती इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्याचं स्वप्न एका अपघाताने क्षणार्धात भंगलं.
सदर रस्त्यावर काही लोकांनी सर्रास अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्ता अरूंद झालाय. भविष्यात अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते. या संदर्भात हनवतखेडा येथील सरपंच सुनील ढेपे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, अचलपूर आणि अन्य यंत्रणांना पत्र देऊन सावध केले होते. मात्र, प्रशासनाकडून दखल घेण्यात न आल्याने एका विद्यार्थीनीला जीव गमवावा लागला आहे.