मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात लोकप्रिय ठरताना दिसत आहे. महिलांचा या योजनेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यातच अपक्ष आमदार रवी राणा यांनी या योजनेवरुन वादग्रस्त विधान केलं होतं. यावर त्यांचा मूळ स्वभाव समोर आला आहे. दोन्ही दाम्पत्य ब्लॅकमेलर असल्याचे समजून येतंय. हे विधान त्यांनी गंमतीने केले नसून जे तुम्ही रोज करत असता तेच तुमच्या जिभेवर येत असतं, असा हल्लाबोल काँग्रेस नेत्या व माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
यशोमती ठाकूर म्हणाल्या की, रवी राणा व नवनीत राणा दोघेही ब्लॅकमेलर आहेत. लाडकी बहीण योजनेवरून त्यांनी केलेलं विधान गंमतीने केलं नसून ते रोज जे करतात तेच त्यांच्या जिभेवर आले आहे. त्यांचा स्वभाव ब्लॅकमेलिंगचा आहे, ते सिद्ध झालं आहे. महिलांसाठी योजना आणायच्या, मतांसाठी त्या वापरायच्या आणि निवडणूक झाली की, ते स्वत:च म्हणतात की, परत घेणार. याचा अर्थ आहे की, एकदा का निवडणूक झाली की, ही योजना बंद करण्याच्या मार्गावर हे नक्की जातील, हे सिद्ध झालं आहे.
कॅश फॉर व्होटचे उत्तर उदाहरण ही योजना आहे. ही गोष्टी सहन न होण्यासारखी आहे. महिलांचे हाल होत आहेत. एकीकडे भाजपने पूजा चव्हाण प्रकरणात आकांडतांडव केले, पुन्हा त्यांनाच मंत्री म्हणून सरकारमध्ये घेतले. आता हेच म्हणत आहेत की, लाडकी योजनेचे पैसे परत घेणार. एकूणच हे असंवैधानिक सरकार असून ब्लॅकमेल व टक्केवारी घेणारं सरकार असल्याचं पुन्हा सिद्ध झालं आहे.
अमरावतीमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना रवी राणा म्हणाले होते की, आमचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे दुप्पट म्हणजे १५०० वरून ३ हजार रुपये प्रतिमहिना करू. आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. जे मला आशीर्वाद देणार नाही,मी तुमचा भाऊ असून १५०० रुपये तुमच्या खात्यातून परत घेणार, असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं. ज्याचं खाल्लं त्याला जागलं पाहिजे. तर सरकार देत राहते. पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे, असंही रवी राणा म्हणाले होते.