Amravati News : खासदार बळवंत वानखडे यांचे पोस्टर फाडल्याने अमरावतीत तणाव, भाजप-महाआघाडीचे कार्यकर्ते भिडले
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amravati News : खासदार बळवंत वानखडे यांचे पोस्टर फाडल्याने अमरावतीत तणाव, भाजप-महाआघाडीचे कार्यकर्ते भिडले

Amravati News : खासदार बळवंत वानखडे यांचे पोस्टर फाडल्याने अमरावतीत तणाव, भाजप-महाआघाडीचे कार्यकर्ते भिडले

Jun 10, 2024 05:35 PM IST

Amravati News : अमरावतीतील राजकमल चौकात महाविकास आघाडीकडून खासदार वानखडेंच्या विजयाप्रित्यर्थ लावलेले बॅनर रविवारी (९ जून)रात्री फाडल्यामुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

खासदार बळवंत वानखडे यांचे पोस्टर फाडल्याने अमरावतीत तणाव
खासदार बळवंत वानखडे यांचे पोस्टर फाडल्याने अमरावतीत तणाव

नरेंद्र मोदींच्या शपथविधीनंतर अमरावतीत जल्लोष करताना नवनियुक्त खासदार बळवंत वानखडे ( Mp Balwant wankhade) यांच्या विजयानिमित्त अभिनंदन करणारे महाविकास आघाडीच्या वतीने लावलेले पोस्टर अज्ञाताने फाडल्याचा प्रकार समोर आला आहे. अमरावतीतील राजकमल चौकात महाविकास आघाडीकडून खासदार वानखडेंच्या विजयाप्रित्यर्थ लावलेले बॅनर रविवारी (९ जून)रात्री फाडल्यामुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात ठिय्या देत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेने भाजप व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत.

नुकत्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव केला. निवडणूक निकालानंतर शहरातील राजकमल चौकात महाविकास आघाडीने मोठे बॅनर लावले होते. पाच दिवसानंतर रविवारी रात्री हे बॅनर फाडण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अमरावती भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाकडून राजकमल चौकात जल्लोष करण्यात आला. या जल्लोषा दरम्यान काही अज्ञातांनी बळवंत वानखडे यांच्या विजयाचे पोस्टर फाडले. हे बॅनर शिवसेना ठाकरे गटाकडून लावण्यात आले होते. या बॅनरची तोडफोड झाल्याचे समजताच शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी यांच्यासह इतर पदाधिकारी व शिवसैनिक घटनास्थळी पोहोचले.

घटनास्थळीमहायुती आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते जमल्याने एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर दोन्ही गटात बाचाबाचीचे प्रकार घडले. राजकमल चौकात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य पाहून अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. राजकमल चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

बॅनर फाडल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला असून त्यांनी पोलिसांत धाव घेत याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. आरोपींना अटक न केल्यास अमरावती जिल्हा बंद आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या प्रकारावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी ट्वीट करून यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘मोदींच्या शपथविधीचा जल्लोष साजरा करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित खासदार बळवंत भाऊ वानखडे यांचे पोस्टर फाडले. एक मागासवर्गीय कार्यकर्ता खासदार झाल्यामुळे भाजपच्या संपूर्ण इकोसिस्टिमच्या पोटात दुखू लागलंय. हा उन्माद योग्य नाही,उन्माद दाखवला म्हणून महाराष्ट्रात गाशा गुंडाळावा लागला, जनतेच्या खासदाराला केवळ मागासवर्गीय आहे म्हणून ही वागणूक देणार असाल तर मतपेटीतून आणखी कडक उत्तर दिलं जाईल.

तत्पुर्वी अमरावतीमध्ये वारंवार अशांतता पसरवण्याचा प्रयत्न होत आहे याची दखल गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे. कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना पाठीशी घालाल तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू !,असा इशाराही ठाकूर यांनी दिला आहे..

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर