राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणावरून वातावरण चांगलंच पेटलं आहे. मनोज जरांगे राज्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांच्या उपस्थितीत पुण्यात अखंड मराठा समाजाकडून मराठा आरक्षण शांतता रॅली काढण्यात आली. त्यातच आता भाजप खासदाराने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे मुख्यमंत्री जरी झाले, तरीही सग्यासोयऱ्यांना मराठा आरक्षण मिळणार नाही. कोणी तशा वल्गनाही करू नये, असे बोंडे यांनी म्हटले आहे.
अमरावती भाजप कार्यालयात रविवारी जिल्हा ओबीसी मोर्चाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. खा. बोंडे यांनीमराठा आरक्षण व ससगे सोयऱ्यांवरून मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधल्याने खळबळ उडाली आहे. रक्ताचे नाते असलेल्या सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणारच असून ते ओबीसीमध्ये येणार आहेत. पण, सग्यासोयऱ्यांना ते कदापीही मिळणार नाही, कारण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान सर्वश्रेष्ठ आहे. संविधानाचे रक्षण करण्यासाठी घटनात्मक संस्था देशात आहेत. त्यामुळे आरक्षणाबाबत कोणीही तशा वल्गना करू नये, समाजात फूट पाडण्याचे काम जरांगे यांनी करू नये. यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान हे मराठा समाजाचे होईल,असे डॉ. अनिल बोंडे म्हणाले.
माझ्या दौऱ्यात अडथळे आणले जात आहेत. माझ्या वाटेला जाऊ नका, नाहीतर राज्यात सभाही घेता येणार नाहीत, माझी पोरं काय करतील हे सांगता येत नाही, असा इशारा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे व शरद पवारांना दिला. त्यांनी म्हटले की, मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या आडून उद्धव ठाकरे, शरद पवारांचं विधानसभेच्या तोंडावर राजकारण करत आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात आरक्षणाची गरजच नाही, या भूमिकेचा पुनरूच्चारही राज ठाकरेंनी केला आहे. आपल्या दौऱ्याचा जरांगे पाटलांशी काहीही संबंध नव्हता, मात्र आपल्या विरोधात जाणीवपूर्वक प्रचार करण्यात आल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.
राज ठाकरे म्हणाले, माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाल्यानंतर मी मनोज जरांगे पाटलांचं नावही घेतलं नव्हतं. मात्र मुद्दाम माझ्याकडे काही माणसं पाठवून घोषणा देण्यात आल्या. घोषणाबाजी करणाऱ्या या लोकांचे शरद पवारांसोबत फोटो आहेत. शुक्रवारी बीडमध्ये घडलेल्या प्रकारात तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जिल्हाप्रमुखच सहभागी होता. जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या आडून शरद पवार व उद्धव ठाकरे विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन राजकारण करत आहेत. मात्र तुम्हाला जे करायचं ते करा पण माझ्या नादी लागू नका. तुमच्याकडे प्रस्थापित आहेत माझ्याकडे विस्थापीत आहेत.