अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. अंजनगाव सुर्जी येथे ही घटना घडली. दहीहंडीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करत असताना त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. राणा यांचे माध्यम समन्वयकांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. काही शिवसैनिकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ठाकरे गटाच्या सुनील खराडे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी रविवारी अमरावती शहरात दहीहंडी स्पर्धा आयोजित केली होती. त्यानंतर सोमवारी दुपारच्या सुमारास ते दर्यापूर येथील कावड यात्रेत सहभागी झाले होते. सायंकाळीच्या सुमारास अंजनगाव सुर्जी तालुक्यात त्यांनी दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले होते. युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने आयोजित या दहीहंडी स्पर्धेत आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा, अभिनेत्री अमिषा पटेल, चंकी पांडे यांच्यासह अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
रवी राणा अंजनगाव सुर्जी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जागेची पाहणी करत असताना आठ ते दहा हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. युवा स्वाभिमानकडून हल्लेखोर हे ठाकरे गटाचे शिवसैनिक असल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यात रवी राणा बचावले असून त्यांना कुठलीही इजा झालेली नाही.
या संदर्भात घटनेचे प्रत्यक्षदर्शी स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनीही सांगितले की, जागेची पाहणी करत असताना ठाकरे गटाच्या आठ ते दहा कार्यकर्त्यांनी अचानक आमदार रवी राणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.